|Tuesday, March 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » बाळासाहेब वड्डर यांचे आमरण उपोषण मागे

बाळासाहेब वड्डर यांचे आमरण उपोषण मागे 

प्रतिनिधी/   चिकोडी

चिकोडी जिल्हा घोषणेसाठी सुरू असलेल्या आंदोलनाने सोमवारी 36 वा दिवस ओलांडला आहे. तसेच माजी आमदार बाळासाहेब वड्डर यांचा आमरण उपोषणाचा पाचवा दिवस होता. बाळासाहेब वड्डर यांची प्रकृती खालावत होती. याची दखल घेत चिकोडीचे संपादना महास्वामी व चिंचणीचे अल्लमप्रभू महास्वामी यांनी सोमवारी आंदोलनस्थळी धाव घेत सदर उपोषण मागे घेण्याची विनंती केली. सदर विनंतीस मान देऊन बाळासाहेब वड्डर यांनी आपले आमरण उपोषण मागे घेतले आहे. मात्र जिल्हा मागणीसाठी साखळी उपोषण जैसे थे सुरूच राहणार आहे.

चिकोडी जिल्हा घोषणा होईपर्यंत आमरण उपोषण मागे न घेण्याच्या निर्णयावर ठाम असलेले माजी आमदार बाळासाहेब वड्डर यांची समजूत घालताना उभय स्वामींनी चिकोडी जिल्हा घोषणेसाठी मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. 15 मार्च पर्यंत बेळगाव जिह्यातील सर्वपक्षीय नेत्यांना बोलावून चर्चा करुन योग्य तो निर्णय घेण्यात येणार आहे. यामुळे सदर आमरण उपोषण मागे घ्यावे, असे उभय स्वामीजींनी बाळासाहेब वड्डर यांना सांगितले. तसेच सदर आमरण उपोषण मागे घ्यावे, अशी विनंती स्वामीजींनी केली. यानंतर नारळ पाणी देऊन उपोषणाची सांगता करण्यास भाग पाडले.

यासंदर्भात अधिक माहिती देताना जिल्हा आंदोलनाचे प्रमुख बी. आर. संगाप्पगोळ म्हणाले, चिकोडी जिल्हा रचनेसंदर्भात दोन शिष्टमंडळे मुख्यमंत्र्यांना भेटून आली. पहिले शिष्टमंडळ हे खासदार हुक्केरी यांच्या नेतृवात तर दुसरे शिष्टमंडळ एआयसीसीचे सचिव आमदार सतिश जारकिहोळी यांच्या नेतृत्वाखाली गेले होते. दरम्यान दोन्हीही शिष्टमंडळांना मुख्यमंत्र्यांनी चिकोडी जिल्हा रचनेबाबत सकारात्मक प्रतिसाद देऊन सर्वपक्षीय नेत्यांशी चर्चा करुन निर्णय घेणार असल्याचे सांगितले.

यावेळी माजी आमदार दत्तू हक्यागोळ, सुरेश ब्याकुडे, बसवराज ढाके, माजी जिल्हा पंचायत सदस्य मलगौडा नेर्ले, बी. एम. पाटील, रावसाहेब कमते, बी. एन. पाटील बंबलवाड, ए. के. पाटील जनवाड, संजू बडिगेर, धोंडीबा हक्यागोळ आदीसह अनेकजन उपस्थित होते.

Related posts: