|Sunday, December 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती विकल्यास कारवाई!

प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती विकल्यास कारवाई! 

प्रतिनिधी / ओरोस:

प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर कायद्याने बंदी असून याचे उल्लंघन करणे हा गुन्हा आहे. त्यामुळे जिल्हय़ात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती कोणी विकताना आढळल्यास पोलीस स्थानकात तात्काळ तक्रार द्यावी. त्यानंतर संबंधितांवर कारवाई केली जाईल, असे आश्वासन जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी सिंधुदुर्ग जिल्हा श्री गणेश मूर्तीकार संघाच्या शिष्टमंडळाला दिले.

प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींमुळे पर्यावरणासह पाणीही दूषित होते. तसेच कमी किमतीत मिळणाऱया मूर्तींमुळे जिल्हय़ातील स्थानिक मूर्तिकारांच्या व्यवसायावर आणि या व्यवसायावर अवलंबून असणाऱया जिल्हय़ातील इतर सर्व घटकांवर याचा विपरित परिणाम होत असल्याने अशा मूर्तींवर बंदी घालण्यासाठी श्री गणेश मूर्तिकार संघाने नुकतीच जिल्हाधिकाऱयांची भेट घेतली. यावेळी झालेल्या चर्चेत जिल्हाधिकाऱयांनी याबाबत संबंधितांवर कारवाई करण्याची ग्वाही दिली.

गणेश मूर्तिकार संघाने जिल्हाधिकाऱयांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, देशात स्वच्छतेत सिंधुदुर्ग जिल्हय़ाचा प्रथम क्रमांक आला असून हा जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून देशात प्रसिद्ध आहे. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल राखणे प्रशासनासह सर्वांचीच जबाबदारी आहे. मात्र सध्या प्लास्टिक ऑफ पॅरिसच्या मूर्तींमुळे पर्यावरणाचा समतोल ढासळत असून पाणीही दूषित होत आहे. कमी वजनाच्या या हलक्या मूर्तीं पाण्यात विरघळत नसल्याने पाण्यावर तरंगतात. त्यामुळे धार्मिक भावना दुखावतात. मोठय़ा शहरामध्ये अशा मूर्तींना मागणी नसल्याने प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती बनविणाऱयांनी आपला मोर्चा सिंधुदुर्ग जिल्हय़ाकडे वळविला आहे. जिल्हय़ाबाहेरून सध्या मोठय़ा प्रमाणात या मूर्ती येण्यास मार्चपासून प्रारंभ होतो.

सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयानुसार, कुठल्याही कारणाने पाण्याचे प्रदूषण करणे हा दंडनीय अपराध आहे. प्रत्येक राज्याने याची अंमलबजावणी करावी, असा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आहे. लगतच्या गोवा व कर्नाटकात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर बंदी असताना यात महाराष्ट्रात का कारवाई होत नाही, असा प्रश्न जिल्हय़ातील मूर्तिकारांनी केला आहे. तसेच या मूर्तींमुळे स्थानिक कारागिरांवर संकट आले आहे. माती तयार करणारे, शिकाऊ कारागीर, मातीचा व्यवसाय करणारे, रंगांचा व्यवसाय करणारे यांच्यावर याचा विपरित परिणाम झाला आहे. सिंधुदुर्ग जिल्हा हा कारागीर तयार होण्याची खाण असून प्लास्टर ऑफ पॅरिसच्या जमान्यामुळे भविष्यात ही कला लोप पावण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे या मूर्तींवर बंदी आणण्याची मागणी जिल्हाधिकाऱयांकडे करण्यात आली.

यावेळी गणेश मूर्तिकार संघाचे अध्यक्ष नारायण सावंत, सचिव दीपक गोवेकर, उपाध्यक्ष राधाकृष्ण नाईक, राजू साळगावकर, उदय अळवणी, दत्तात्रय मठकर, प्रकाश सावंत, अशोक देसाई, वासुदेव पेडणेकर, दीपक जोशी, रमेश मांजरेकर आदी उपस्थित होते.

Related posts: