|Tuesday, March 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » ‘कास्ट व्हॅलिडिटी’ पावतीबाबत अद्याप सूचना नाहीत!

‘कास्ट व्हॅलिडिटी’ पावतीबाबत अद्याप सूचना नाहीत! 

निवडणूक निर्णय अधिकाऱयांची माहिती :  तहसील कार्यालयात प्रशासन सज्ज! : आचारसंहिता भंगाच्या तक्रारी फोनवरूनही शक्य, पथके तैनात

प्रतिनिधी / कणकवली:

कणकवली नगरपंचायत निवडणुकीसाठी प्रशासकीय पातळीवर सर्व सज्जता करण्यात आली आहे. उमेदवारी अर्ज तपासणीसाठी तहसील कार्यालयात पाच स्वतंत्र टेबल्सची व्यवस्था करण्यात आली आहे. अचारसंहिता भंगाच्या तक्रारी फोन माध्यमातूनही करता येणार आहेत. आचारसंहिता पथक, भरारी पथक, व्हीडिओग्राफी सर्व्हेलियन्स व पाहणी पथक अशी पथकेही तैनात करण्यात आली आहेत. दरम्यान, उमेदवारांनी अर्जासोबत जातवैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. अद्याप वैधता प्रमाणपत्रासाठीची पावती सादर करण्याची मुभा देण्याच्या कोणत्याही सूचना प्राप्त नसल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी नीता सावंत-शिंदे यांनी दिली.

नगरपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने माहिती देण्यासाठी तहसील कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत श्रीमती सावंत-शिंदे यांनी ही माहिती दिली. यावेळी तहसीलदार वैशाली माने, मुख्याधिकारी अवधूत तावडे उपस्थित होते.

नगरपंचायत निवडणुकीसाठी सध्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे. रविवार सुट्टीचा दिवस वगळून 19 मार्चपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करायचे आहेत. 20 रोजी छाननी होणार असून 26 रोजी दुपारी 3 पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. छाननीत अर्ज अवैध ठरलेल्यांना अपील करण्यासाठी तीन दिवसांची मुदत असणार आहे.

उमेदवारी अर्ज भरताना उमेदवारांना अडचणी येऊ नयेत, यासाठी तहसील कार्यालयात कागदपत्र तपासणीसाठी पाच टेबल्स आहेत. नगरसेवकपदांसाठी 4, तर नगराध्यक्ष पदासाठी एक स्वतंत्र टेबल आहे. ऑनलाईन उमेदवारी अर्ज भरताना काही अडचणी आल्यास तहसील कार्यालयातील स्वागत कक्षाच्या ठिकाणी मदत कक्ष सुरू करण्यात आलेला आहे. आचारसंहितेच्या तक्रारीसाठी फोन लाईनची व्यवस्थाही करण्यात आली आहे. हा नंबर 24 तास सुरू असणार आहे. मात्र, तक्रारीत स्पष्टता असावी, असेही श्रीमती शिंदे-सावंत यांनी सांगितले.

तहसील कार्यालयात उमेदवारांना आवश्यक कागदपत्रांसाठी एक खिडकी योजना सुरू करण्यात आली आहे. येथे कोणत्याही विभागाच्या परवानगीबाबत आवश्यक कार्यवाही करण्यात येणार आहे. पोलीस कर्मचारीही तेथे तैनात असणार आहेत. उमेदवार अथवा त्यांच्या प्रतिनिधींनी याचा लाभ घ्यावा. आचारसंहिता भंगाबाबत स्वतंत्र पथके असून सोशल मीडिया, इंटरनेट, पेडन्यूज आदींसाठी जिल्हास्तरावर सनियंत्रण समितीही स्थापन करण्यात आलेली आहे.

उमेदवारांना खर्च सादर करण्यासाठीही स्वतंत्र व्यवस्था करण्यात आलेली आहे. यासाठी चार कर्मचारी नियुक्ती करण्यात आले आहेत. सद्यस्थितीत ऑफलाईन माहिती घेण्यात येणार आहे. उमेदवारांना जातवैधता प्रमाणपत्राची आवश्यकता असल्याची अट अद्याप तरी कायम आहे. निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार राज्य मंत्रिमंडळाने दिलेल्या मुदतवाढीची अधिसूचना निघाल्यास त्यानुसार कार्यवाही करण्यात येणार आहे. मात्र, तोपर्यंत पडताळणी प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असल्याचे श्रीमती सावंत-शिंदे म्हणाल्या.

Related posts: