|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » माओवादी हल्ल्यात 9 पोलीस हुतात्मा

माओवादी हल्ल्यात 9 पोलीस हुतात्मा 

छत्तीसगडमधील सुकमा जिल्हय़ातील हिंसाचार, गस्त घालत असताना स्फोट

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

छत्तीसगड राज्यातील नक्षलग्रस्त सुकमा जिल्हय़ात माओवाद्यांच्या हल्ल्यात केंद्रीय राखीव दलाच्या 9 पोलिसांना हौतात्म्य प्राप्त झाले आहे. ही घटना मंगळवारी सकाळी 8 वाजण्याच्या आसपास घडली. हे पोलीस त्यांच्या वाहनातून गस्त वनभागात गस्त घालत असताना माओवाद्यांनी स्फोट घडवून आणला. तसेच गोळीबारही केला. या घटनेत 10 पोलीस जखमी असून 4 जणांची प्रकृती गंभीर आहे. दुपारी साडेबारा वाजताही आणखी एक हल्ला करण्यात आला.

सुकमा जिल्हय़ातील किस्ताराम भागात आबुजमध वनप्रदेशात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या 212 वया तुकडीचे 25 पोलीस गस्त घालत होते. या भागात माओवादी दडले आहेत, अशी माहिती मिळाल्यावरून ही गस्त सुरू होती. यावेळी अचानक सुमारे 100 शस्त्रसज्ज माओवाद्यांनी त्यांना चारी बाजूंनी घेरले. हे माओवादी पोलिसांच्याच गणवेषात असल्याने गोंधळ उडाला. माओवाद्यांनी वाहनावर आधुनिक स्फोटकांच्या साहाय्याने हल्ला केला. यात पोलीसांच्या गस्ती वाहनाचा चेंदामेंदा झाला. चार पोलीस जागीच मृत्यूमुखी पडले. स्फोट घडविल्यानंतर माओवाद्यांनी गोळीबारही केला.

या घटनेचे वृत्त कळताच घटनास्थळी जादा पोलीस पाठविण्यात आले. तसेच जखमींची सुटका करण्यासाठी वायुदलाच्या हेलिकॉप्टरचे साहाय्य घेण्यात आले. सहा पोलिसांची सुखरूप सुटका करण्यात आली. सर्व जखमींवर रांची येथील रूग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. हा गेल्या एक वर्षातील तिसरा मोठा हल्ला आहे.       

हल्ला सूडापोटी ?

बारा दिवसांपूर्वी याच भागात पोलीसांनी 10 नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले होते. त्याचा सूड म्हणून हा हल्ला करण्यात आला असावा, अशी माहिती सूत्रांनी दिली. सहा महिन्यांपूर्वी सुकना येथेच घडविलेल्या हल्ल्यात 20 पोलीस हुतात्मा झाले होते. त्या घटनेची दुःखद आठवण ताजी करणारी ही घटना आहे.

300 नक्षलवादी ठार

छत्तीसगड राज्यात पोलिसांनी नक्षली आणि माओवादी यांच्या विरोधात जोरदार कारवाई चालविली आहे. गेल्या दोन वर्षात 300 माओवाद्यांन कंठस्नान घालण्यात आले आहे. त्यामुळे या भागातील त्यांची पकड ढिली होत आहे. ते आपले अस्तित्व दाखविण्यासाठी अशा प्रकारचे हल्ले मधून मधून करतात. तथापि, प्रशासन न डगमगता यांचा मुकाबला करीत आहे, अशी माहिती केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या प्रवक्त्याने दिली. हे हल्ले होत असले तरी परिस्थिती गेल्या काही वर्षांमध्ये बरीच सुधारणी आहे, असा दावा पोलिसांनी केला आहे.

राजनाथसिंग यांना दुःख

या हल्ल्याचा केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग यांनी निषेध केला आहे. असे हल्ले पुन्हा घडू नयेत म्हणून प्रयत्न करण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पोलिस प्रशिक्षण आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग वाढविण्याची योजना तयार आहे. राज्य सरकारलाही आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत. पोलीस व राज्य सरकार विचलित न होता कार्य करीत आहेत असे त्यांनी स्पष्ट केले.

भीषण…

ड शेकडो माओवाद्यांचा अद्यापही वनभागात संचार

ड गुप्तचर विभागाच्या माहितीवरून सुरू होती गस्त

ड संपूर्ण भागाची नाकेबंदी, चार संशयितांना अटक

ड जखमींवर नजीकच्या रूग्णालयांमध्ये उपचार सुरू