|Tuesday, March 26, 2019
You are here: Home » क्रिडा » ऑल इंग्लंड बॅडमिंटन चॅम्पियनशिप आजपासून

ऑल इंग्लंड बॅडमिंटन चॅम्पियनशिप आजपासून 

वृत्तसंस्था/ बर्मिंगहम

आजपासून खेळवली जाणारी प्रतिष्ठेची ऑल इंग्लंड बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धा जिंकण्यासाठी महिला गटात पीव्ही सिंधू व पुरुष गटात किदाम्बी श्रीकांत, हे भारताचे सध्या बहरात असणारे दोन स्टार खेळाडू आपला पूर्ण अनुभव पणाला लावतील, अशी अपेक्षा आहे. ऑल इंग्लंड चॅम्पियनशिप ही बॅडमिंटनमधील सर्वात प्रतिष्ठेची स्पर्धा म्हणून विशेष नावारुपाला आली असून यापूर्वी प्रकाश पदुकोण (1980) व पुलेला गोपीचंद (2001) या दोघाच भारतीयांना तेथे जेतेपद संपादन करता आले आहे. त्या पार्श्वभूमीवर, यंदा सिंधू व श्रीकांतकडून भारताला विशेष अपेक्षा असतील.

या हंगामात सिंधू व श्रीकांत या उभयतांनाही पहिल्या फेरीत तुलनेने बरेच सोपे ड्रॉ मिळतील, हे स्पष्ट आहे. याचवेळी मागील लढतीतील उपजेती सायना नेहवालला मात्र सलामीच्या लढतीतच विद्यमान अव्वलमानांकित व विद्यमान विजेती तई त्झू यिंग (चायनीज तैपेई) हिचे खडतर आव्हान पेलावे लागेल. तई त्झू ही अलीकडील कालावधीत सायनाची कर्दनकाळ ठरत आली असून तिने सायनाविरुद्ध 9 विजय संपादन केले आहेत तर 5 पराभव स्वीकारले आहेत. पण, सर्वात चिंतेची बाब म्हणजे सायनाला मागील सातही लढती गमवाव्या लागल्या आहेत. यंदा इंडोनेशियन मास्टर्स फायनलमध्ये अलीकडेच ती त्झूविरुद्ध पराभूत झाली होती.

दुसरीकडे, चौथी मानांकित पीव्ही सिंधू हिची सलामीची लढत थायलंडची नवोदित बॅडमिंटनपटू पोर्नपवी चोचूवोंग हिच्याविरुद्ध होईल, असे संकेत आहेत. पुरुष गटात श्रीकांतला देखील तुलनेने सोपा ड्रॉ लाभला आहे. प्रेंचमन ब्राईस लेव्हेर्डझविरुद्ध त्याची सलामीची लढत होऊ शकते. पुलेला गोपीचंद यांनी घेतलेल्या परिश्रमामुळे भारतीय बॅडमिंटनला सुवर्णयुग येत असून या पार्श्वभूमीवर ऑल इंग्लंड चॅम्पियनशिपमधील जेतेपदाची झळाळी लाभली तर ते अर्थातच विशेष स्वागतार्ह ठरेल.

यापूर्वी, या स्पर्धेत लंडन ऑलिम्पियक कांस्यजेती सायना नेहवाल 2015 मध्ये कॅरोलिना मारिनकडून पराभूत झाली तर 2017 मध्ये सिंधूला उपांत्यपूर्व फेरीपर्यंत पोहोचता आले होते. पुरुष गटातील तृतीय मानांकित श्रीकांत 2017 मध्ये सर्वोत्तम फॉर्ममध्ये राहिला. वर्षभरात त्याने 4 सुपरसिरीज जिंकल्या आणि यंदा विश्व अव्वलमानांकित व्हिक्टर ऍक्झेल्सन गुडघ्याच्या दुखापतीमुळे बाहेर फेकला गेला असताना त्याच्याकडे जेतेपद जिंकण्याची नामी संधी असणार आहे. श्रीकांत गतवर्षी सलामीच्या लढतीतच पराभूत झाला होता. त्याचा वचपा काढण्याचीही यंदा त्याच्याकडे संधी असेल. ही प्रतिष्ठेची स्पर्धा जिंकण्यासाठी पुढील पाच दिवस भारतीयांना पूर्ण सर्वस्व पणाला लावावे लागेल आणि त्यात अपेक्षित यश लाभले तरच दुर्मिळ सुवर्ण जिंकत नवा इतिहास रचता येणार आहे.

सलामीच्या लढतीत त्झू हिचे कठीण आव्हान स्वीकारावे लागलेल्या सायनाने आपण विजय खेचून आणण्यासाठी हरसंभव प्रयत्न करणार असल्याचे याप्रसंगी नमूद केले. ‘तई त्झू उत्तम बहरात आहे आणि केवळ भारतीय खेळाडूच तिच्याविरुद्ध हरत आहेत, असे अजिबात नाही. सध्याची ती सर्वोत्तम खेळाडू आहे. ती आपल्या खेळावर मेहनत घेते. पण, याचा अर्थ असा नव्हे की आपण तिला पराभूत करु शकत नाही’, असे सायना याप्रसंगी म्हणाली.

रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्य जिंकणाऱया सिंधूने या स्पर्धेसाठी 6 आठवडे कसून सराव केला असून ती देखील जय्यत तयारीसह येथे उतरणार आहे. यंदा अनेक स्पर्धा होत असून या सर्व स्पर्धांमध्ये सर्वोत्तम कामगिरी साकारण्याचा माझा प्रयत्न असेल, असे सिंधूने स्पष्ट केले. पुरुष गटात जागतिक क्रमवारीतील तृतीय मानांकित श्रीकांतने या स्पर्धेत खेळताना व एरवी देखील आपल्यासमोर प्रकाश पदुकोण व गोपीचंद यांच्या लक्षवेधी कामगिरीमुळे बरीच प्रेरणा मिळते, असे नमूद केले.

अन्य भारतीय स्पर्धकांमध्ये सिंगापूर ओपन चॅम्पियन साई प्रणित व जागतिक क्रमवारीतील 12 वा मानांकित एच. एस. प्रणॉय डार्क हॉर्स मानले जात आहेत. प्रणितची सलामीची लढत कोरियाचा माजी अव्वलमानांकित सन वान हो याच्याविरुद्ध तर प्रणॉयची लढत चायनीज तैपेईच्या आठव्या मानांकित चोऊ तिएन चेनविरुद्ध होईल. ‘पायाला वेदना होत असल्याने मी केवळ दोनच आठवडे सराव करु शकलो आणि या पार्श्वभूमीवर मला फारशा अपेक्षा नाहीत. पण, तरीही ताज्या दमाने कोर्टवर उतरता येणार असल्याने ही माझ्यासाठी जमेची बाजू असेल’, असे प्रणॉय यंदाच्या हंगामाबद्दल बोलताना म्हणाला.

Related posts: