|Tuesday, March 26, 2019
You are here: Home » क्रिडा » अंतिम फेरीतील स्थाननिश्चितीसाठी भारत सज्ज

अंतिम फेरीतील स्थाननिश्चितीसाठी भारत सज्ज 

तिरंगी टी-20 क्रिकेट मालिका : आज बांगलादेशविरुद्ध लढत

वृत्तसंस्था/ कोलंबो

रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील युवा खेळाडूंचा भारतीय संघ आज तिरंगी टी-20 मालिकेत बांगलादेशविरुद्ध लढेल. मागील सलग दोन विजयानंतर सध्या भारताची धाव सरासरी +0.21 अशी उत्तम असली तरी जर-तरच्या सांख्यिकी समीकरणांवर अवलंबून राहण्याऐवजी बांगलादेशला येथे नमवून स्पर्धेतील अंतिम फेरीतील स्थान निश्चित करण्यावर संघाचा येथे प्रामुख्याने भर असेल. भारतीय प्रमाणवेळेनुसार, सायंकाळी 7 वाजता या लढतीला प्रारंभ होणार आहे.

यापूर्वी, मागील साखळी सामन्यात बांगलादेशने यजमान लंकेविरुद्ध चक्क 215 धावांचा यशस्वी पाठलाग करत सनसनाटी विजय संपादन केला होता. त्यामुळे, इथे त्यांचे मनोबल उंचावलेले असेल, हे मात्र निश्चित आहे आणि याच पार्श्वभूमीवर भारताच्या यंग ब्रिगेडला विशेष दक्ष रहावे लागेल. भारताने या स्पर्धेसाठी युवा खेळाडूंना संधी देण्याचा निर्धार केला असला तरी दीपक हुडा, मोहम्मद सिराज व अक्षर पटेल यांना इथे अद्याप एकदाही खेळवले गेले नसल्याने हा मूळ उद्देश पूर्ण यशस्वी झाला नसल्याचे स्पष्ट आहे. योगायोगाने हुडाला यापूर्वी भारतातच झालेल्या लंकेविरुद्धच्या मालिकेतही अंतिम संघातून संधी मिळाली नव्हती.

धवनचा फॉर्म महत्त्वाचा

डावखुऱया शिखर धवनने 153 धावांचे योगदान देत उत्तम फटकेबाजी केली असली तरी आतापर्यंत भारतासाठी हंगामी कर्णधार रोहित शर्माचा खराब फॉर्म ही सर्वात चिंताजनक बाब ठरत आली आहे. मागील सामन्यात रैना 27 धावांवर बाद झाला तर मनीष पांडे व दिनेश कार्तिक यांनी युवा फलंदाज ऋषभ पंतला मैदानात उतरावे लागणार नाही, हे निश्चित केले. आता रोहित शर्मा केएल राहुलला सलामीला बढतीवर पाठवून स्वतः चौथ्या स्थानी फलंदाजीला येईल का, हे पहावे लागेल. यापूर्वी, आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्सतर्फे रोहितने सातत्याने असे प्रयोग केले आहेत.

केएल राहुल हा स्पेशालिस्ट सलामीवीर असून याशिवाय, मध्यफळीत धावफलक सातत्याने हलता ठेवण्यातही त्याचा हातखंडा आहे. मागील लढतीत मात्र त्याचे स्वयंचीत होणे आश्चर्याचे ठरले होते. या मालिकेत बांगलादेशला भारताने 139 धावात जरुर रोखले. पण, त्यापुढील लढतीतच तमिम इक्बाल, लिटॉन दास, मुश्फिकूर रहीम यांनी लंकन भूमीत सर्वाधिक धावांचा यशस्वी पाठलाग करण्याचा पराक्रम गाजवला, ते ही लक्षवेधी आहे. गोलंदाजीच्या आघाडीवर, आयपीएलमधील महागडा भारतीय खेळाडू जयदेव उनादकट (11.5 कोटी) तिन्ही सामन्यात महागडा ठरला असून विशेषतः लंकेविरुद्ध त्याचा 4 षटकांचा कोटाही रोहितला पूर्ण करवून घेता आलेला नाही. लंकेविरुद्ध 3 षटकात 1-35, बांगलादेशविरुद्ध 4 षटकात 3-38 व लंकेविरुद्ध 3 षटकात 1-33 असे त्याचे पृथ्थकरण राहिले.

गोलंदाजांकडून अनेक अपेक्षा

उनादकटच्या अनुभवामुळे त्याचे अंतिम संघातील स्थान अबाधित राहील. मात्र, त्याच्यापेक्षाही सिराज हा अधिक प्रभावी मारा करु शकतो, असे मानणारा एक गटही व्यवस्थापनात कार्यरत आहे. शार्दुल ठाकुरने मागील दोन सामन्यात उत्तम मारा केला असून विजय शंकरने देखील प्रगल्भतेचे दर्शन घडवले आहे. अन्य गोलंदाजात ऑफस्पिनर वॉशिंग्टन सुंदरने विशेषतः पॉवर प्लेमध्ये समयोचित मारा केला आहे. त्याच्यापेक्षा अधिक प्रसिद्धीच्या झोतात राहिलेला यजुवेंद्र चहल मात्र लंकेविरुद्ध मागील दोन्ही लढतीत महागडा ठरला होता. दुसऱया बाजूने कुलदीप यादव गोलंदाजी करत नसेल तर त्याला सूर सापडत नाही, हे येथे आणखी एकदा प्रकर्षाने दिसून आले आहे.

संभाव्य संघ

भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन (उपकर्णधार), केएल राहुल, सुरेश रैना, मनीष पांडे, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), दीपक हुडा, वॉशिंग्टन सुंदर, यजुवेंद्र चहल, अक्षर पटेल, विजय शंकर, शार्दुल ठाकुर, जयदेव उनादकट, मोहम्मद सिराज, ऋषभ पंत.

बांगलादेश : महमुदुल्लाह (कर्णधार), तमिम इक्बाल, सौम्या सरकार, इमरुल कायेस, मुश्फिकूर रहीम (यष्टीरक्षक), शब्बीर रहमान, मुस्तफिजूर रहमान, रुबेल होसेन, तस्किन अहमद, अबू हिदर, अबू झायेद, अरिफुल हक, नझमूल इस्लाम, नुरुल हसन, मेहदी हसन, लिटॉन दास.

सामन्याची वेळ : सायं. 7 पासून.

 

स्पर्धेतील गुणतालिका

संघ / सामने / विजय / पराभव / गुण / सरासरी

भारत / 3 / 2 / 1 / 4 / +0.210

श्रीलंका / 3/ 1 / 2 / 2 / -0.072

बांगलादेश/ 2 / 1 / 1 / 2 / -0.231

Related posts: