|Tuesday, March 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » ‘यशवंतराज’मध्ये पुणे विभागात सांगली जि.प.प्रथम

‘यशवंतराज’मध्ये पुणे विभागात सांगली जि.प.प्रथम 

प्रतिनिधी/ सांगली

राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून नुकत्याच तपासणी करण्यात आलेल्या यशवंत पंचायत राज अभियानाचा निर्णय जाहीर करण्यात आला असून त्यामध्ये पुणे विभागात सांगली जिल्हा परिषद 78.75 गुण प्रथम क्रमांकावर आहे. तर पंचायत समितीमध्ये शिराळा पंचायत समिती 93.25 गुण मिळवत प्रथम आहे. तरी आता राज्यस्तरीय स्पर्धेसाठी सांगली जिल्हा परिषद आणि पंचायत समिती शिराळा पात्र ठरले असल्याची माहिती, अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी दिली आहे. राज्यस्तरावरही सांगली जिल्हा परिषद अव्वल येण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्य शासनाच्यावतीने गतिमान प्रशासन आणि लोकाभिमुख प्रशासनासाठी यशवंत पंचायत राज अभियान राबविले जाते. या अभियानामध्ये सहभागी झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यांच्याबाबत सुरू असलेल्या कामांची तपासणी करण्यात येते. या तपासणीसाठी विशेष गुण दिले जातात. त्यानुसार जिल्हापरिषद आणि पंचायत समितीच्याकडून प्रस्ताव मागितले जातात त्या प्रस्तावाची छाननी आणि तपासणी करून प्रत्यक्षात त्रयस्थ यंत्रणेकडून ही तपासणी करण्यात येते. त्यानुसार जिल्हा परिषदेची काही दिवसापूर्वी तपासणी करण्यात आली होती. त्यामध्ये जिल्हा परिषदेला पुणे विभागात सर्वाधिक असे 78.75 इतके गुण मिळाले आणि ही जिल्हापरिषद अव्वल ठरली आहे. तर शिराळा पंचायत समितीनेही विभागात 93.25 गुण मिळवत त्यांनी प्रथम क्रमांक मिळवला आहे. आता विभागात अव्वल आलेल्या जिल्हा परिषदा आणि पंचायत समिती राज्यस्तरीय तपासणीसाठी पात्र ठरल्या असून राज्यस्तरावरील समिती आता सांगली जिल्हा परिषद आणि पंचायत समिती शिराळा यांची तपासणी करण्यात येणार आहे.

यशवंत पंचायत राज्य अभियान यशस्वीरित्या राबविण्यासाठी सर्वच पदाधिकारी आणि प्रशासनाकडून प्रयत्न झाले आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत बगाडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपाली पाटील यांच्यासह सर्व खातेप्रमुख आणि संबंधित विभागाकडून प्रयत्न झाल्याने तसेच कर्मचाऱयांनी उत्कृष्ट कामकाज केल्याने हे यश सहज शक्य झाले असल्याचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी सांगितले.

 

Related posts: