|Thursday, August 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » शशांक मिराशी नेमके कुठल्या पक्षाचे?

शशांक मिराशी नेमके कुठल्या पक्षाचे? 

शिवसेनेचा सवाल : आचऱयाच्या विकासासाठी शिवसेना कटिबद्ध!

 

वार्ताहर / आचरा:

  आचरा ग्रामपंचायत निवडणुकीपूर्वी काँग्रेस पक्षाशी रात्रीच्या वेळी हातमिळवणी करून नंतर स्वाभिमान पक्षाचे गोडवे गाणारे शशांक मिराशी हे नक्की कोणत्या पक्षाचे आहेत, हे त्यांनी जाहीर करावे. आमदार वैभव नाईक यांनी आचरा आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका दिल्यावर शशांक मिराशी यांना पोटशूळ उठल्यामुळेच ते बेताल वक्तव्य करीत असल्याची टीका मालवण शिवसेना तालुकाप्रमुख बबन शिंदे व शिवसेनेत नव्याने दाखल झालेले विनायक परब यांनी आचरा येथे पत्रकार परिषदेत केली.

 यावेळी मालवण शिवसेना तालुकाप्रमुख बबन शिंदे, विनायक परब, नारायण कुबल, जगदिश पांगे, उदय दुखंडे, नितीन घाडी, शाम घाडी, समीर लब्दे, दिलीप पराडकर, ग्रामपंचायत सदस्य अनुष्का गावकर, दिव्या आचरेकर, योगेश गावकर उपस्थित होते

  शिंदे म्हणाले, केणी यांनी आमच्या पक्षाची काळजी करू नये. शिवसेनेत घेतले जाणारे निर्णय कार्यकर्त्यांना विचारात घेऊनच घेतले जातात. आचरा ग्रामपंचायतीतील पराभव आम्हाला मान्य आहे. आचऱयातील विकासकामांचा धडाका पालकमंत्री केसरकर, आमदार नाईक व खासदार राऊत यांच्या सहकार्याने सुरुच ठेवणार आहोत. मंदार केणी यांनी शिवसेनेची काळजी करण्यापेक्षा कार्यकर्त्यांत आपली किती पत शिल्लक आहे, ती तपासून पाहावी.

शशांक मिराशी नक्की कोणत्या पक्षात : विनायक परब

आचरा ग्रामपंचायत निवडणुकीपूर्वी शशांक मिराशी हे रात्रीच्या वेळी घेण्यात आलेल्या  काँग्रेस पक्ष पदाधिकाऱयांबरोबरच्या बैठकीत स्वाभिमान पक्षाला धडा शिकवण्याची भाषा बोलत होते. त्यानंतर दुसऱया दिवशी स्वाभिमानच्या पत्रकार परिषदेत काँग्रेसला धडा शिकवण्याची भाषा बोलत होते. एका रात्रीत शब्द फिरवणाऱया मिराशी यांना आचरेवासीय ओळखून आहेत, असा टोला विनायक परब यांनी लगावला. मिराशी सरपंच असताना त्यांच्यावर अविश्वसाचा ठराव आणून सदस्यांनी त्यांना पायऊतार केले होते. आपल्या सासूलाही त्यांनी आचरा ग्रामपंचायत निवडणुकीत उतरवले. मात्र त्यांचाही पराभव झाला. केसेस ओपन करण्याचे आव्हान देणारे मिराशी यांच्यावरच केस दाखल असून त्यांना पोलीस ठाण्यात हजेरी लावावी लागते. त्यांनी केसेस ओपन करण्याचे आव्हान आमदारांना देऊ नये, असेही परब म्हणाले.

मच्छीमार्केटचे उद्घाटन करणारच

   शिंदे म्हणाले, आचरा मच्छीमार्केटचे श्रेय हे आमदार किरण पावस्कर यांना आम्ही देतो. तयार झालेले मच्छीमार्केट एका ठेकेदारासाठी आम्ही बंद ठेवू देणार नाही. आठ दिवसांत आचरा मच्छीमार्केटचे उद्घाटन आमदार पावसकर यांना विश्वासात घेऊन शिवसेना स्टाईलने करणार आहोत. आचरा प्राथमिक आरोग्य केंद्रात आठवडाभरही पुरणारा औषधसाठा नसताना त्यासाठी रुग्णकल्याण समितीचे अध्यक्ष असलेले जि. प. सदस्य जेरोन फर्नांडिस यांनी किती ठराव केले, हे जाहीर करावे, असे आव्हान माजी शाखाप्रमुख जगदिश पांगे यांनी दिले.