|Sunday, August 25, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » शिवसेनेचा मुख्य शत्रू भाजपच!

शिवसेनेचा मुख्य शत्रू भाजपच! 

विकासाच्या आड येणाऱया पक्षाला उखडून टाका

घोणसरेतील मेळाव्यात शिवसेना नेत्यांचे आवाहन रिफायनरी लादल्यास राजीनामा देऊन जनतेसोबत

 

प्रतिनिधी /चिपळूण

कॉंग्रेस, राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष संपल्यात जमा आहे. त्यांचे नेते तुरूंगात असून अन्यही त्याच मार्गावर आहेत. त्यामुळे आता भाजप हाच आपला प्रथम क्रमांकाचा शत्रू असून विकासाच्या आड येणाऱया या पक्षाला आगामी निवडणुकामध्ये मुळासकट उखडून टाका. विधानसभेवर शिवसेनेचा भगवा फडकवण्याचा निर्धार शिवसेना नेते सुभाष देसाई, अनंत गीते, रामदास कदमांसह रवींद्र वायकर यांनी शनिवारी येथे केला. दरम्यान नाणार येथील प्रस्तावित रिफायनरीला शिवसेनेचा ठाम विरोध असून या प्रकल्पाला मुख्यमंत्र्यांनी परवानगी दिली तर सर्व मंत्री राजीनामा देऊन कोकणातील जनतेबरोबर रस्त्यावर उतरतील असा इशारा यावेळी नेत्यांनी दिला.

गुहागर विधानसभा क्षेत्रातील कार्यकर्त्यांसाठी घोणसरे येथे आयोजित शिवसेनेच्या निर्धार मेळाव्यात शिवसेना नेत्यांनी यापुढे गटतट विसरून गुहागरसह कोकणातील सर्व मतदार संघांवर शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज रहावे असे आवाहन केले. यावेळी उद्योगमंत्री देसाई यांनी सांगितले की, एकीकडे जैतापूर अणूउर्जा प्रकल्पाला समर्थन करत पायघडय़ा घालणारे नारायण राणे दुसरीकडे नाणार रिफायनरीला विरोध करत आहेत. हा माणूस दुटप्पी आहे. राणेंना कणकवली व त्यानंतर वाद्रय़ात शिवसेनेने पराभूत केले. यापुढे कुठूनच निवडून येण्याची शक्यता नसल्याने ते राज्यसभेत गेले.

केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी लोकसभेची आपणाला अजिबात चिंता नाही. आता रामदास कदम पुर्ण ताकदीने आपल्यासोबत असल्याने मी अधिकच निश्चिंत आहे. हिंमत असेल तर सुनील तटकरे, जयंत पाटील यांनी आपल्या विरोधात निवडणूक लढवावी, असे आव्हान त्यांनी दिले. देशभरातील वातावरण बदलत असून गुहागर मतदार संघातही शिवसेनेचा भगवाच फडकेल असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला. पालकमंत्री रवींद्र वायकर यांनीही विकासाच्या आड येणाऱया भाजपला धडा शिकवण्यासाठी या मतदार संघात हक्काचा आमदार निवडून आणा असे आवाहन केले.

….भास्कर आपके साथ है ः रामदास कदम

पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी राणेंवर टीकास्र सोडताना स्वाभिमान गहाण ठेवणारा नेता असा उल्लेख केला. राणेंच्या लाचारीमुळे कोकणची बदनामी झाल्याचे त्यांनी सांगितले. भाजप हाच आपला मुख्य शत्रू असून त्याला त्यांची जागा येणाऱया निवडणुकांत दाखवायची आहे. या मतदार संघात झालेल्या पराभवाचे शल्य आपणाला आजही आहे. त्यावेळी माझा पराभव हा भास्कर जाधव यांनी नाही तर विनय नातू यांनी केला. त्यामुळे या मतदार संघावर ज्यादिवशी भगवा फडकेल त्यादिवशी मी आणि गीते दोघे एकत्रीतरित्या सर्वांना पेढे वाटू अस सांगितले. आता ‘अंदर की बात है…भास्कर आपके साथ है’ अशी कोटी करताच उपस्थितानीही मनमुराद दाद दिली.

यावेळी जिल्हा संपर्कप्रमुख विजय कदम, आमदार सदानंद चव्हाण, जिल्हाप्रमुख सचिन कदम, राजू महाडीक, जिल्हा परिषद अध्यक्षा स्नेहा सावंत, उपाध्यक्ष संतोष थेराडे, जिल्हा महिला संघटक दर्शना महाडीक, शंकर कांगणे, महिला बालकल्याण समिती सभापती ऋतुजा खांडेकर, बाळा खेतले, विधानसभा क्षेत्रप्रमुख बाळा कदम, तालुकाप्रमुख महेश नाटेकर, प्रताप शिंदे आदी उपस्थित होते.

राष्ट्रवादी अन् भास्कर जाधवांवर चकार शब्दही नाही!

आतापर्यंत कोणत्याही मेळाव्यात राष्ट्रवादीचे आमदार भास्कर जाधव यांच्यावर सडकून टीका करणारे शिवसेना नेत्यान या मेळाव्यात मात्र त्यांच्याविरोधात चकार शब्दही काढला नाही. भाजपा आणि नारायण राणेंवर सडकून टीका करीत असताना जाधव आणि राष्ट्रवादीवर भाष्य न केल्याने शिवसैनिकही आश्चर्यचकीत झाले. त्यातच रामदास कदम यांनी ‘अंदर की बात है.. भास्कर आपके साथ है’ असे सांगितल्यानंतर अधिकच संभ्रम निर्माण झाला.

रामपूर पंचायत समिती सदस्याला निमंत्रणच नाही!

ज्या रामपूर जिल्हा परिषद गटात हा मेळावा झाला तेथील पंचायत समिती सदस्या अनुजा चव्हाण, माजी सभापती जितेंद्र चव्हाण यांना या मेळाव्याचे निमंत्रणच दिले गेलेले नाही. तरीही रामपूर येथे पक्षाचे मंत्री आल्यानंतर चव्हाण यांनी उपस्थित राहून त्यांचे स्वागत केले. मात्र अनुजा चव्हाण यांच्यासह अनेक स्थानिक शिवसैनिकांनी मेळाव्याकडे पाठ फिरवली. याबाबत अनेकांनी उघडपणे आपली नाराजी मेळाव्यानंतर पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.