|Thursday, January 17, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » भ्रष्टाचार हीच मोदी नावाची ओळख

भ्रष्टाचार हीच मोदी नावाची ओळख 

भ्रष्टाचार हीच मोदी नावाची ओळख

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

मोदी हजारो कोटींचा घोटाळा करून देशाबाहेर पळाला तर क्रिकेट जगतामधील सर्वात भ्रष्ट माणसाचे नावही मोदीच आहे. भ्रष्टाचाराचे नाव अशी मोदी नावाची ओळख बनली आहे, अशी बोचरी टीका काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली. महाकाव्य महाभारतातील पात्रांचा आधार घेत काँग्रेस अध्यक्षांनी भाजपवर हल्लाबोल केला. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे कौरवांसारखे केवळ सत्तेसाठी संघर्ष करणारे आहेत. काँग्रेस पांडवांसारखा सत्यासाठी लढा देणारा पक्ष आहे. भाजप एका संस्थेचा आवाज आहे तर काँग्रेस देशाचा आवाज आहे, असेही ते म्हणाले.

 काँग्रेस महाअधिवेशनाच्या समारोपाच्या भाषणात राहुल गांधी म्हणाले, हजारो वर्षांपूर्वी कुरूक्षेत्रावर महायुद्ध झाले होते. यातील कौरवांसारखे भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ केवळ सत्तेसाठी लढा देत आहेत. तर काँग्रेस हे पांडवांसारखे सत्यासाठी युद्धभूमीवर उतरले आहेत. भाजपचे नेतृत्व हे खोटारडे असल्याचे देशातील जनता स्वीकारेल. सत्तेमुळे अहंकारी झालेल्या भाजपचे मूळ त्यांना माहीत आहे. या पक्षाचा अध्यक्ष एका खूनप्रकरणातील संशयित आरोपी आहे. आम्ही भाजपसारखी कार्यपद्धती राबविल्यास जनता आम्हाला स्वीकारणार नाही. कारण देशातील लोकांच्या आमच्याकडून खूप अपेक्षा आहेत, असेही त्यांनी नमूद केले.

दुकानांपासून श्रीलंकेपर्यंत केवळ चीनच

 सर्वपातळीवर केंद्र सरकार अपयशी ठरले आहे. आज देशात सर्वत्र चीनची उत्पादने आहेत. डोकलाम, नेपाळ, ब्रम्हदेश आणि श्रीलंका येथेही चीन घुसखोरी करत आहे.  नीरव मोदी याने देशाचे 33 हजार कोटी लाटले. त्यावर अर्थमंत्री अरुण जेटली आणि भाजप नेते कोणतेच भाष्य करत नाहीत. कारण ते केवळ भांडवलदारांसाठी योजना राबवत आहेत. अच्छे दिन, स्वच्छ भारतचा नारा देत सरकार सर्वाना मोदी मायाजालात अडकवत आहेत, असेही गांधी म्हणाले.

  सर्जिकल स्ट्राईक त्यानंतर नोटाबंदी, गब्बर सिंग टॅक्स आणि संसदेसमोरील योगासने अशा वेगवेगळय़ा कार्यक्रमांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे केवळ उडय़ा मारत आहेत, अशी बोचरी टीकाही त्यांनी केली. जेव्हा गरज असेल तेव्हा पंतप्रधान बोलत नाही. त्याचबरोबर सत्य बोलणाऱयांची गळचेपी करतात. आम्ही देशाचे सेवक असून देशहितासाठी कधीच तडजोड करणार नाही. जनतेसमोर सत्य मांडतच राहू, असेही ते म्हणाले.

सत्ता बदल हेच बेरोजगारीवरील उत्तर

 बेरोजगारी आणि शेतकऱयांसमोरील संकट या देशासमोरील दोन महत्त्वाच्या समस्या आहेत. एकीकडे देशाची अर्थव्यवस्था वेगाने प्रगती करत असल्याचा कांगावा केला जात आहे. तर दुसरीकडे लाखो तरुण रोजगाराच्या प्रतीक्षेत आहेत. बेरोजगारीचा भयावह प्रश्न कोण सोडवणार, असा सवाल जनतेमधून होत आहे. या प्रश्नाचे उत्तर हवे असल्यास केवळ सत्ता परिवर्तन हाच पर्याय आहे, असा दावाही त्यांनी केला. 

          नेते आणि कार्यकर्त्यांमधील दरी दूर करणार

काँग्रेस पक्षामध्ये नेते आणि कार्यकर्त्यांमधील दरी निर्माण झाली आहे ही वस्तुस्थिती आहे. कार्यकर्ते हेच पक्षाचे बलस्थान आहेत. देशामध्ये बदल आणण्याचे सामर्थ्य केवळ त्यांच्यातच आहे; पण नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये मोठी दरी आहे. ही दरी प्रेमाने दूर करणे हेच आपले प्राथमिक उद्दिष्ट असल्याचेही गांधी यांनी स्पष्ट केले.

  राहुल गांधी निवडणार स्वत:ची टीम

यावेळी पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांना आपली टीम निवडण्याचे स्वातंत्र्य असणाऱया ठरावाला यावेळी संमती देण्यात आली. आता पक्षाची कार्यकारणी स्वत: राहुल गांधी निवडतील. ही कार्यकारणी पक्षासंदर्भातील महत्त्वाचे निर्णय घेईल. ही कार्यकारणी लवकरच स्थापन करण्यात येईल, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.

Related posts: