|Thursday, July 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » गोमंतक मराठा समाजाची विविध क्षेत्रात गरुड भरारी

गोमंतक मराठा समाजाची विविध क्षेत्रात गरुड भरारी 

वार्ताहर/ पणजी

गोमंतक मराठा समाज, गोवा संस्थेच्या तिसवाडी तालुका समितीतर्फे पणजी-मळा येथील सेवा सदन वास्तुमध्ये महिलांसाठी भजन कार्यशाळेला प्रारंभ झाला असून महिलादिनापासून ज्येष्ठ भजनी शिक्षक पार्सेकर यांनी महिलांना भजनी धडे देण्यास सुरुवात केली आहे. याला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद प्राप्त झाला आहे.

मळा-पणजी येथील सेवा सदन वास्तुत दर शुक्रवार व शनिवार भजनाचे वर्ग घेण्यात येणार असून या कार्यशाळेच्या उद्घाटन समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार सिद्धार्थ कुंकळकर हजर होते. पणजी महानगरपालिकेच्या माजी महापौर तथा विद्यमान नगरसेविका वैदेही नाईक, संस्थेचे अध्यक्ष गोरख मांद्रेकर, संगीत शिक्षक गणेश पार्सेकर व तिसवाडी तालुका समितीच्या अध्यक्ष उत्कर्षा बाणस्तारकर उपस्थित होत्या. मान्यवरांच्या हस्ते समई प्रज्वलनाने व गोव्याचे भाग्यविधाते भाऊसाहेब बांदोडकर यांच्या तसबिरीला हार घालून भजनी कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी बोलताना कुंकळकर यांनी सांगितले की, गो. म. समाजातील बांधव-भगिनींनी सर्वच क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. याच समाजाने पारंपरिक संगीताचा पाया रचला आहे. संगीत, शिक्षण तसेच विविध क्षेत्रात बरीच गरुड भरारी घेतली आहे. शासनाकडे आज विविध उपक्रम आहेत. विविध योजना भाऊसाहेबांनी राबविल्या होत्या. त्यांच्या पावलावर पाऊल ठेऊन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी हा वारसा पुढे नेऊन तो लोकांपर्यंत पोचविण्याचे काम केले आहे. सरकार अशा कार्यक्रमांना नेहमीच प्रोत्साहन देत आले आहे. संगीताच्या बाबतीत तसेच समाजाच्या कोणत्याही उपक्रमाला आपला नेहमीच पाठिंबा राहिल, असे आश्वासन दिले.

नगरसेविका वैदेही नाईक यांनी सांगितले की, गोव्यात पुरुषांएवढय़ाच महिला भजनात रस दाखवित आहेत ही कौतुकास्पद गोष्ट आहे. तिसवाडी तालुक्यातील महिलांनी भजन कार्यशाळेत आपला सहभाग दाखविला आहे ही अत्यंत आनंदाची बाब आहे. याबद्दल तिसवाडी तालुका समितीने अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. संस्थेचे अध्यक्ष गोरख मांद्रेकर यांनी आपल्या स्वागतपर भाषणात सांगितले की, गोमंतक मराठा समाज आपल्याच समाजबांधवांसाठी विविध उपक्रम राबवित नाही. सर्वच समाजबांधवांची गोडी एकमेकांना लागावी, विविध क्षेत्रात एकत्रितपणे काम करावे हा समाजाचा हेतू आहे. त्यासाठीच सर्व समाजातील भगिनींनी या भजन कार्यशाळेत सहभागी व्हावे व याचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.

संगीत शिक्षक गणेश पार्सेकर यांचेही भजनावर मौलीक भाषण झाले. प्रथम महेश्वरी वळवईकर व श्रद्धा नाईक यांनी पुष्पगुच्छ देऊन पाहुण्यांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोहिदास नाईक यांनी केले. तिसवाडी तालुका समितीच्या अध्यक्ष उत्कर्षा बाणस्तारकर यांनी आभार मानले.

ज्या महिलांना या भजन कार्यशाळेत सहभागी व्हायचे असेल तर त्यांनी महेश्वरी वळवईकर (8390990767) किंवा उत्कर्षा बाणस्तारकर (9545168802) या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.