|Friday, January 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » खासदार अंगडीकडून जनतेची दिशाभूल

खासदार अंगडीकडून जनतेची दिशाभूल 

प्रतिनिधी/   चिकोडी

चिकोडी जिल्हा घोषणा व सीमाप्रश्न याचा एकमेकाशी संबंध नाही. पण जिल्हा विभाजनाची वेळ आल्यावर सीमाप्रश्नाचा मुद्दा चिकोडी जिल्हय़ाशी जोडण्यात येत आहे. त्यातून खासदार सुरेश अंगडी हे जनतेची दिशाभूल करत आहेत. ते त्यांनी करु नये असा इशारा ज्येष्ठ नेते बी. आर. संगाप्पगोळ यांनी रविवारी दिला. चिकोडी जिल्हा घोषणेसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी बेंगळूर येथे सर्वपक्षीय नेत्यांची सभा बोलाविली आहे. या सभेत जिल्हय़ासंदर्भात गोड बातमी या भागातील जनतेस देण्यास नेते मंडळींनी पुढाकार घ्यावा, असेही आवाहन त्यांनी केले.

रविवारी आंदोलनाच्या 42 व्या दिवशी पत्रकारांशी ते बोलत होते. संगाप्पगोळ पुढे म्हणाले, 21 वर्षापासून राज्य सरकारकडून चिकोडी उपविभागातील जनतेवर अन्यायच केला आहे. यंदाच्या हिंदू नववर्षाच्या प्रारंभी मुख्यमंत्री सिद्धरामय्या 25 लाख जनतेस चिकोडी जिल्हा संदर्भात गोड बातमी देतील, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. चिकोडी जिल्हा झाल्यास मोठय़ा प्रमाणात विकासकामे राबविण्यात मदत होणार आहे.

21 वर्षापूर्वी जे. एच. पटेल यांच्या कार्यकाळात चिकोडीतील स्थानिक लोकप्रतिनिधींच्या आडमुठय़ा धोरणामुळे चिकोडी जिल्हा घोषणा रखडला आहे. आता स्थानिक लोकप्रतिनिधी जिल्हा घोषणेविषयी एकसंघ झाले होते. असे असताना  चिकोडी जिल्हय़ाशी खासदार सुरेश अंगडी यांचा काहीही संबंध नसताना त्यांनी सीमाप्रश्नाचा विषय चव्हाटय़ावर आणला. शिवाय चिकोडी जिल्हा घोषणेस विरोध करण्याचा कट रचला आहे. याकडे राज्य सरकारने दुर्लक्ष करावे. भागातील 25 लाख जनतेच्या हितासाठी जिल्हा घोषित करावा, अशी मागणी त्यांनी केले.

आंदोलकांतर्फे गुळ वाटप

चिकोडी जिल्हा मागणीसाठी सुरू असलेले आंदोलन रविवारी अनोख्या पद्धतीने करण्यात आले. चिकोडी जिल्हा घोषणेची गोड बातमी मिळावी यासाठी आंदोलकांनी वाहनधारकांना गुळाचे वाटप केले. कडुलिंबाविषयी आंदोलकांना विचारले असता गेल्या 21 वर्षापासून चिकोडी परिसरातील नागरिकांच्या वाटय़ाला कडूच आले आहे. आतातरी गोड वाटय़ाला येऊ दे अशी आपली इच्छा असल्याचे सांगितले.

याप्रसंगी माजी आमदार दत्तू हक्यागोळ, प्रा. एस. वाय. हंजी, संजू बडिगेर, धोंडिबा हक्यागोळ, गूलजार शिरगावकर, डी. आर. बाडकर, निजगुणी आलूरे, मारुती खोत, डी. आर. पाशापुरे, सुरेश ब्याकुडे यांच्यासह आंदोलनकर्ते उपस्थित होते.

Related posts: