|Friday, July 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » नवचैतन्य,मांगल्याचा गुढीपाडवा उत्साहात

नवचैतन्य,मांगल्याचा गुढीपाडवा उत्साहात 

प्रतिनिधी / बेळगाव

    यश, आरोग्य, मांगल्य, माधुर्य, वैभव, सामर्थ्य, सिद्धी, सौभाग्य, स्थैर्य आणि संकल्पाचे प्रतीक असणारा गुढीपाडवा सण उत्साहात साजरा करण्यात आला. साडेतीन मुहुर्तापैकी एक मानला जाणारा गुढीपाडवा म्हणजेच मराठी नववर्षाचा प्रारंभ मोठय़ा उत्साहात झाला. घरोघरी तोरण बांधून गुढी उभारून, गोड पदार्थांचा नैवेद्य करून पारंपरिकता आणि संस्कृतीचा ठेवा जपणारा गुढीपाडवा शहर परिसरात उत्साहात साजरा करण्यात आला.

 नवीन कार्याचा शुभारंभ

पाश्चिमात्य संस्कृतीमुळे 1 जानेवारी रोजी नववर्ष साजरे करण्यात येत असले तरी हिंदू धर्मात गुढी पाडव्याला महत्त्व असून हिंदू धर्म बांधवांचे हेच नवे वर्ष आहे. यामुळे व्यापार, उद्योग, व्यवसायाबरोबरच नवीन कार्याची सुरूवात पाडव्याचा मुहुर्त साधत करण्यात आली. यामुळे नवीन वस्तूंची खरेदी, नवीन कार्याचा शुभारंभ, उद्घाटन समारंभ याबरोबरच एकमेकांना नववर्षाच्या शुभेच्छा देत नववर्ष उत्साहात साजरे करण्यात आले.

चैत्र महिन्याचा पहिला दिवस गुढी पाडवा म्हणून साजरा केला जातो. यामुळे पाडव्याच्या निमित्ताने घरासमोर काढलेल्या रांगोळय़ा, चौकटीला बांधलेले तोरण, दारात उभी असणारी गुढी, पाटी आणि नोंदी रजिस्टरचे पूजन, घरोघरी  गोड पक्वानांचा बेत असे उत्साहवर्धक चित्र पहायला मिळाले. साडेतीन मुहूर्तापैकी एक असणारा पाडव्याचा मुहूर्त साधत सोने, वाहने तसेच विविध साहित्यांची मोठय़ा प्रमाणात खरेदी करण्यात आली. नववर्षाच्या साडेतीन मुहूर्तावर खरेदीचा आणि शुभकार्याचा देखील मुहूर्त साधण्यात आला.

पूजा आणि गोडधोड पदार्थ

 घरोघरी गुढी उभारण्यात आल्या होत्या. बांबूला तांब्याचा कलश बांधून हळद कुंकू लावून खण आणि साडी, फुलांचा हार घालून कडुलिंबाची पाने, आंब्यांच्या डहाळय़ा बांधून आनंदाची गुढी अभारण्यात आली. यामुळे सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत सर्वत्र डौलाने फडकणाऱया गुढय़ा पहायला मिळाल्या. याबरोबरच  परंपरेप्रमाणे देवदेवतांची पूजा करुन गोडधोड पक्वानांचा नैवेद्य दाखवून गुढी पाडवा साजरा करण्यात आल्या. पुरणाची पोळी, श्रीखंड पुरी तसेच खीर पुरी असे गोडधोड पक्वान बनविण्यात आले. कुटुंबातील सर्वांनी एकत्र येऊन गोड पदार्थांचा आस्वाद घेत नववर्षारंभाचे स्वागत केले.