|Thursday, January 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » हलगा-मच्छे बायपास रस्त्याच्या विरोधात आज शेतकरी रस्त्यावर

हलगा-मच्छे बायपास रस्त्याच्या विरोधात आज शेतकरी रस्त्यावर 

बेळगाव / प्रतिनिधी

हलगा-मच्छे बायपास रस्ताकामाचा शुभारंभ सोमवारी होणार आहे. मात्र, या बायपास रस्त्यास शेतकऱयांचा विरोध असून आपली शेतजमीन वाचविण्यासाठी शेतकरी सोमवारी रस्त्यावर उतरणार आहेत. आपला न्यायालयीन लढा ते आणखी तीव्र करणार आहेत. या रस्ताकामास विरोध दर्शविण्यासाठी सोमवारी दुपारी 4 वाजता सर्व शेतकरी बांधवांनी अलारवाड क्रॉस येथे जमावे, असे आवाहन शेती बचाव समितीच्यावतीने करण्यात आले आहे.

हलगा-मच्छे बायपास रस्त्याचा प्रारंभ केंद्रीय रस्ते वाहतूक विकासमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते सोमवारी करण्यात येणार आहे. मात्र, प्रशासनाच्या या कुटील डावाला विरोध दर्शविण्यासाठी तसेच आपली शेतजमीन वाचविण्यासाठी शेतकरी बांधवांनी आपला लढा तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. बायपास रस्त्याच्या विरोधात शेतकरी एकवटला असून, सोमवारी होणाऱया कार्यक्रमास विरोध दर्शविण्यासाठी शेतकरी बांधवांची रविवारी बैठक पार पडली. या बैठकीत कोणत्याही परिस्थितीत पिकावू शेतजमीन बायपास रस्त्यासाठी देणार नसल्याचा निर्धार शेतकऱयांनी व्यक्त केला. राजवाडा कंपाऊंड, वडगाव येथील श्री ज्ञानेश्वर मंदिरात ही बैठक पार पडली.

स्थगिती मिळविण्याचा प्रयत्न करणार

सोमवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. शेतजमीन वाचविण्यासाठी न्यायालयीन लढा सुरूच राहणार असून, या बायपास रस्ताकामाला स्थगिती मिळविण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे बैठकीत सांगण्यात आले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भेटून येथील शेतकऱयांवरील होत असणाऱया अन्यायाबाबत माहिती देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

शेती बचाव समितीचे अध्यक्ष बाळाराम पोटे यांच्यासह नगरसेवक मनोहर हलगेकर, एपीएमसी सदस्य महेश जुवेकर, देवदास चव्हाण-पाटील, शांताराम होसूरकर, किर्तीकुमार कुलकर्णी, अमृत भाकोजी, हणमंत बाळेकुंद्री, अमोल देसाई, संजय हलगेकर, जयराम हलगेकर, शाम कुडुचकर, मोहन कुडुचकर, कल्लाप्पा बाळेकुंद्री, हणमंत बांदे, सुभाष लाड, मनोहर गडकरी, देवदास पोटे यांच्यासह शेतकरी बांधव बैठकीस उपस्थित होते.

 किरण ठाकुर यांची घेतली भेट

दरम्यान, शेती बचाव समितीचे अध्यक्ष बाळाराम पोटे यांनी रविवारी यासंदर्भात शहर म. ए. समितीचे अध्यक्ष, तरुण भारतचे समूहप्रमुख व सल्लागार संपादक किरण ठाकुर यांची भेट घेतली आणि हलगा-मच्छे बायपास रस्त्यासंदर्भात केंद्रीय रस्ते वाहतूक विकासमंत्री नितीन गडकरी यांची भेट घडवून आणावी, अशी विनंती केली. यावेळी किरण ठाकुर यांनी गडकरी यांची भेट घडवून आणण्याचे आश्वासन त्यांना दिले. याप्रसंगी माजी नगरसेवक नेताजी जाधव, अमृत भाकोजी, देवदास चव्हाण-पाटील आदी उपस्थित होते.

Related posts: