|Friday, January 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » पाडवा मुहूर्तामुळे विक्रमी प्रमाणात आंबा मुंबईकडे

पाडवा मुहूर्तामुळे विक्रमी प्रमाणात आंबा मुंबईकडे 

प्रतिनिधी/ रत्नागिरी

यावर्षी वेगाने वाढत जाणारा उन्हाळा लक्षात घेता आंबा फळे वेगाने तयार होत आहेत. गुढीपाडव्यानंतर मोठय़ा प्रमाणात फळांची तोड अपेक्षित असून मुंबईच्या वाशी फळ बाजारात मोठी आवक अपेक्षित आहे. सध्या दररोज 17 हजार पेटय़ा घाऊक बाजारात उतरवल्या जात असून ही संख्या हळूहळू वाढून 50 हजार पेटय़ांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे.अनेकांनी पाडव्याच्या मुहूर्तावर रविवारी आंब्याची तोड केली असून सोमवारी भरपूर माल वाशी बाजारात पोहोचण्याची अपेक्षा आहे.

वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संजय पानसरे म्हणाले, आंबा पेटय़ांची आवक या आठवडय़ापासून वाढेल. त्याचबरोबर आंब्याच्या किंमती घसरतील. सुमारे 20 टक्केपर्यंत या किंमती घसरण्याची शक्यता आहे. 1500 ते 4000 रुपये दरम्यान हापूस आंबा पेटी घाऊक बाजारात उपलब्ध आहे. 4 ते 9 डझन एवढे आंबे प्रत्येक पेटीत भरलेले असतात. सामान्यपणे मार्चमध्ये हापूस आंब्याच्या किंमती कमी येण्यास सुरुवात होते. यावर्षी आंबा पीक 25 टक्केपर्यंत कमी येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

  पानसरे म्हणाले, आंबा उत्पादन कमी होत असल्याने यावर्षी किंमती फार मोठय़ा प्रमाणात कमी येतील, अशी शक्यता नाही. देवगड आणि रत्नागिरी परिसरातून आंबा मोठय़ा प्रमाणात मुंबई बाजारात दाखल होत आहे. त्याशिवाय बदामी, केसर, ग्लेन यासारख्या जातींचे आंबेदेखील बाजारात येत आहेत. मार्च मध्यापासून नंतर आंबा हंगाम भरात येईल. गतवर्षी 6 हजार रुपये डझनपासून आंबा विक्रीला सुरुवात झाली होती.

  दरवर्षी पाडव्याच्या मुहूर्तावर अनेक शेतकरी मुहूर्ताची आंबा तोड करतात. हा आंबा पाडव्याच्या दुसऱया दिवशी वाशी बाजारात पोहोचतो. एकदम अधिक माल बाजारात आल्यानंतर दर कमी होण्यास सुरुवात होते. सोमवारी अधिक माल बाजारात येईल, अशी अपेक्षा आहे. रविवारी पाडवा मुहूर्ताच्या फळ तोडणीनंतर हा आंबा सोमवारी वाशी फळ बाजारात पोहांचण्याची अपेक्षा आहे. वाशी येथील किरकोळ विक्रेते सरफराज आलम यांनी पत्रकारांना सांगितले की, 700 ते 1500 रुपयांच्या दरम्यान आम्ही एक डझन आंबे विकत आहोत. दरदिवशी 15 ते 20 डझन आंब्यांची विक्री होती. गुढीपाडव्यानंतर हे दर कमी होतील.

 

Related posts: