|Thursday, June 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » पंढरपूर नगरसेवक खूनप्रकरणी सांगलीत छापे

पंढरपूर नगरसेवक खूनप्रकरणी सांगलीत छापे 

प्रतिनिधी/ सांगली

 पंढरपूर येथील अपक्ष नगरसेवक संदीप पवार याच्या खून प्रकरणाचे सांगली कनेक्शन असल्याचा संशय पोलिसांना आहे. गतवर्षी सांगलीमधील कर्नाळ रोडवरील गोवर्धन चौकात अक्षय उर्फ बबलू धनंजय सुरवशे (वय 22) याच्यावर गोळीबाऱ केल्याप्रकरणी नगरसेवक संदीप पवारसह सहाजणांवर संशय व्यक्त करण्यात आला होता. त्यामुळे भर दिवसा झालेल्या संदीप पवार याच्या खून प्रकरणात बबलूचा हात असण्याच्या संशयाने सोलापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक विजय कुंभार यांच्या पथकाने सोमवारी सांगलीत छापे टाकले. कर्नाळ रोड परिसरात सुरवशेचा  कसून शोध घेतला. पण, तो हाती लागला नाही. त्यामुळे रात्री उशीरा पथक सोलापूरला रवाना झाले.

 मूळचा पंढरपूर येथील असणारा अक्षय सुरवसे हा कर्नाळ रोडवरील दत्तनगरमध्ये राहण्यास होता. भर दिवसा त्याच्यावर सहाजणांनी गोळीबार केला होता. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार पंढरपूर येथील प्रभाग दहाचे अपक्ष नगरसेवक संदीप पवार, अर्जून पवार, सचिन चौगुले, भैय्या पवार, नागेश धोत्रे आणि रामा पवार या सहाजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

 पंढरपूरमधील गँगवॉरमध्येही समावेश असलेल्या बबलू सुरवसे याच्यावर गणपती मंडाळासमोर नीलेश माने याच्या खून प्रकरणी अटक करण्यात आली होती. जामिनावर सुटल्यापासून त्याला सांगलीत मामाकडे ठेवण्यात आले होते.  गुन्हेगारीतून बाहेर पडून चांगल्या मार्गाला लावण्यासाठी त्याला मामाने सांगलीत आणले आहे. शिवशंभो चौकात मामाचा बांबू विक्रीचा व्यवसाय तो संभाळत होता. पंढरपूरचा संपर्क तोडला असतानाही त्याच्यावर सांगलीत पाच ते सहा वेळा हल्ल्याचा प्रयत्न झाला होता. त्याच्यावर गोळीबार झाल्याने खळबळ उडाली होती. तेव्हापासून तो सावध झाला होता.

  एका हल्लेखोराला बबलूने ओळखले

बबलूने त्यावेळी आपल्यावर हल्ला केलेल्यापैकी एकाला ओळखले होते. पण, पुढे तपासात काहीच निष्पन्न झाले नव्हते. त्यामुळे संदीप पवारच्या खुनात बबलू  सुरवशेचा सहभाग असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाल्याने पो.नि.विजय कुंभार यांच्या पथकाने सांगलीत छापे टाकले. पण, तो हाती लागला नसल्याने पथक रात्री सोलापूरला परतले. त्याचबद्दल पथकाने महत्वपूर्ण माहिती मिळवली असल्याचे सांगण्यात आले.