|Monday, October 22, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » प्रथमदर्जा साहाय्यक रमेश हिरेहोळी याला लाच घेताना अटक

प्रथमदर्जा साहाय्यक रमेश हिरेहोळी याला लाच घेताना अटक 

खानापूर / वार्ताहर

खानापूर नगरपंचायतीमधील प्रथम दर्जा साहाय्यक रमेश हिरेहोळी याला 15 हजाराची लाच घेताना बेळगाव भ्रष्टाचार प्रतिबंधक दलाच्या अधिकाऱयांनी रंगेहाथ पकडून अटक केली आहे. खानापूर, दुर्गानगरमधील एक जागा मालकाच्या नावे करण्यासाठी 25 हजाराची लाच मागितल्याने सदर जागा मालकाने भ्रष्टाचार प्रतिबंधक दलाच्या मदतीने त्याला रंगेहाथ पकडून दिले. या कामी अन्य एकजण पिंजऱयात अडकला असून त्याच्यावरही कारवाई करण्यात आली आहे. खानापूर नगरपंचायतीवर झालेल्या या कारवाईमुळे भ्रष्ट अधिकाऱयांचे धाबे दणाणले आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, खानापूर, दुर्गानगरमधील रहिवासी भरत अळवणी यांनी सर्व्हे नंबर 71/ए या जमिनीत स्वतःच्या राहत्या घराच्या पाठीमागे 1162 चौ. फूट जागा खरेदी केली आहे. सदर जागा नावे करून घेण्यासाठी त्यांनी नगरपंचायतीकडे अर्ज केला होता. या कामी नोंदणी विभागाचे प्रथम दर्जा साहाय्यक रमेश हिरेहोळी यांनी जागा नावे करून उतारा मिळवून देण्यासाठी तब्बल 25 हजाराची मागणी भरत अळवणी यांच्याकडे केली होती. अळवणी यांनी विनवणी करून दहा हजार रु. देण्याचे मान्य केले व महिन्यापूर्वी 10 हजार रु. दिले होते. परंतु रमेश हिरेहोळी यांनी एकूण 25 हजार रु. दिले नाहीत तर फाईल रद्द करण्याची धमकी देऊन पंधरा दिवसांपासून हिरेहोळी यांनी पैशासाठी अळवणी यांच्याकडे तगादा लावला होता. शेवटी हताश झालेल्या भरत अळवणी यांनी हिरेहोळी याला धडा शिकविण्यासाठी काही जाणकारांची मदत घेऊन बेळगाव जिल्हा भ्रष्टाचार प्रतिबंधक दलाचे निरीक्षक वाय. एस. धरनायक यांची भेट घेऊन प्रकरणाची माहिती दिली. भ्रष्टाचार प्रतिबंधक दलाच्या अधिकाऱयांनी सापळा रचून रमेश हिरेहोळी याला सदर 15 हजार रु. रक्कम देण्याची व्यूहरचना केली. पण कारवाईच्या वेळेत रमेश हिरेहोळी यांनी सदर रक्कम आपल्याकडे न घेता शशिकांत महाजन यांच्याकडे देण्याची सूचना केली. त्यामुळे शशिकांत महाजन अलगदपणे अधिकाऱयांच्या जाळय़ात सापडला. पण या प्रकरणी भरत अळवणी यांच्याकडे मागितलेली रक्कम व केलेली सूचना याबाबतचे संपूर्ण ध्वनिमुद्रण झाल्याने रमेश हिरेहोळी याला दोषी ठरवून त्याला अटक करण्यात आली आहे.

सदर कारवाई जिल्हा पोलीसप्रमुख अमरनाथ रेड्डी, डीएसपी रघू यांच्या मार्गसुचीप्रमाणे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाचे निरीक्षक वाय. एस. धरनायक, साहाय्यक बी. सी. गौडर, रवि मावळकर, एल. एस. होसमणी, लिंगय्या मठ्ठद, गस्ती आदींनी केली आहे.

खानापूर नगरपंचायतीच्या इतिहासात भ्रष्टाचाराविरुद्ध झालेली ही पहिलीच कारवाई आहे. या नगरपंचायतीमध्ये काही विभागातील अधिकारी मोठय़ा प्रमाणात भ्रष्टाचाराच्या वाटेवर आहेत. जनतेकडून मोठय़ा प्रमाणात पैशाची मागणी केल्याच्या अनेक तक्रारी आहेत. पण या विरोधात कोणीही कारवाईचे सत्र हाती घेतले नव्हते. या प्रकरणी नगरपंचायत समितीनेही अनेक वेळा कर्मचाऱयांना सूचना करूनही त्यांनी दुर्लक्ष केले हेते. काही नगरसेवकांवर अरेरावी केल्याच्या तक्रारी आहेत. पण सोमवारी भरत अळवणी यांनी भ्रष्टाचाराविरोधात उचललेले पाऊल भ्रष्ट अधिकाऱयांना चांगलेच चपराक देणारे ठरले. यामुळे अधिकाऱयांत चांगलीच धास्ती निर्माण झाली आहे.

Related posts: