|Tuesday, July 16, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » डोंगरपाल डिंगणेत मृत माकड आढळले

डोंगरपाल डिंगणेत मृत माकड आढळले 

प्रतिनिधी / बांदा:

माकडताप बाधित डोंगरपाल गावात मृत माकड मिळण्याचे प्रमाण वाढतच आहेत. डिंगणे, नेतर्डे गावांमध्येही मृत माकड सापडत आहेत. गेल्या दोन दिवसात डोंगरपाल येथे चार, तर डिंगणे येथे एक मृत माकड सापडले. आठवडय़ापूर्वी नेतर्डे येथे मृत माकड सापडला होता. वनखात्याच्या पथकाने मृत माकडांची विल्हेवाट लावली.

डोंगरपाल गावात गेल्या महिनाभरात माकडतापाने हैराण करून सोडले आहे. यात दोघांना आपला प्राण गमवावा लागला आहे.तर 13 जणांना माकडतापाची लागण झाली आहे. त्यातच दिवसेंदिवस मृत माकडांचे प्रमाण वाढत असल्याने ग्रामस्थ भीतीच्या छायेखाली वावरत आहे.मंगळवारी डोंगरपाल येथील देऊळवाडी व चव्हाटावाडी येथे चार मृत माकडे भरवस्तीत मृत अव्सथेत आढळली.तर डिंगणे ग्रुप ग्रामपंचायतीचे उपसरपंच जयेश सावंत यांच्या काजु बागायतीमध्ये मृत माकड सापडले. याची कल्पना बांदा वनविभागाला ग्रामस्थांनी दिल्यानंतर बांदा वनपाल एस.एस.शिरगांवकर, वनरक्षक रमेश पाटील, मनोहर गावडे, आत्माराम सावंत यांनी मृत माकडाची विल्हेवाट लावली.गावात किंवा अन्य भागात मृत माकड आढळल्यास तातडीने संपर्क करण्याचे आवाहन बांदा वनपाल एस.एस.शिरगांवकर यांनी उपस्थित ग्रामस्थांना केले.

सद्यस्थितीत काजु हंगाम चालु असल्याने ग्रामस्थाना काजु बागायतीमध्ये जाताना ऑईल लावण्यासाठी मोठय़ा प्रमाणात उपलब्ध करावे अशी मागणी येथील उपसरपंच जयेश सावंत यांनी केली आहे. बांदा प्राथमिक आरोग्य केंद्राचं वैदयकीय अधिकारी जगदीश पाटील यांनी या ठिकाणी बाधित गावात मंगळवारी, गुरूवारी आणि शनिवारी ओपीडी सुरू केली आहे. त्यातही बरेच ग्रामस्थ तपासणी करून घेतात.तर कोणालाही ताप आल्यास किंवा त्याची लक्षणे दिसल्यास बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात यावे असे आवाहनही पाटील यांनी केले आहे.