|Wednesday, June 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » मोटारसायकल अपघातात अभियंता ठार

मोटारसायकल अपघातात अभियंता ठार 

प्रतिनिधी/ बेळगाव

मोटारसायकल अपघातात बेंगळूर येथील अभियंता तरुण जागीच ठार झाला. तर अन्य दोघेजण जखमी झाले. बुधवारी सकाळी बीएसएनएल कार्यालयाजवळ हा अपघात घडला आहे.

लियोन एमॅन्युवेल नॉयल (वय 24, रा. बेंगळूर, सध्या रा. बेळगाव) असे अपघातात जागीच ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर मोटारसायकल चालविणारा राकेश राजेंद्र (वय 24, रा. नंजनगुड, सध्या रा. बेळगाव) हा जखमी झाला आहे.

आणखी एक मोटारसायकलस्वार प्रकाश मारुती कोळीकोप्प (वय 21, रा. बसव कॉलनी) हा ही जखमी झाला आहे. बुधवारी सकाळी 9.20 वाजण्याच्या सुमारास खानापूर रोडवरील बीएसएनएल कार्यालयाजवळ हा अपघात घडला असून जखमींवर सिव्हिल हॉस्पिटल व खासगी इस्पितळात उपचार करण्यात येत आहेत.

अपघातात जागीच ठार झालेला लियोन हा देसूर येथील एम. जी. ऑटोमोटीव्हजमध्ये मेकॅनिकल इंजिनिअर म्हणून सेवा बजावत होता. हा तरुण 15 दिवसांपूर्वीच नोकरीसाठी बेळगावात आल्याचे सांगण्यात आले. बुधवारी सकाळी केए 22 ईवाय 3121 क्रमांकाच्या मोटारसायकलीवरून लियोन व राकेश दोघे फोर्ट रोडला जात होते.

गोगटे सर्कलहून बीएसएनएल कार्यालयापर्यंत येऊन तेथे मोटारसायकल आंबा भवनकडे वळविताना नंबर प्लेट नसलेल्या सुझुकी मोटारसायकलची त्याला धडक बसली. धर्मवीर संभाजी चौकपासून गोगटे सर्कलकडे जाणाऱया या मोटारसायकलच्या ठोकरीने पाठीमागे बसलेला लियोन जागीच ठार झाला. वाहतूक दक्षिण विभाग पोलीस स्थानकात या अपघाताची नोंद झाली आहे.