|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » भंगार व्यावसायिकाचा खून

भंगार व्यावसायिकाचा खून 

भरणे येथील घटना,

रक्ताने माखलेले लाकूड, दगड सापडले

शोध घेण्याचे पोलीसांसमोर आव्हान

प्रतिनिधी /खेड

भरणे भंगार गोळा करणाऱया तरूणाचा लाकूड व दगडाने ठेचून खून करण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. गुरूवारी सकाळी 9 च्या सुमारास या तरूणाचा मृतदेह आढळून आला असून त्याच्या शेजारीच रक्ताने माखलेले लाकूड व दगड आढळून आला. सायंकाळी उशिरापर्यंत मृतदेहाची ओळख पटलेली नाही. श्वानपथकाच्या माध्यमातून खून्यापर्यत पोहचण्याचा प्रयत्न अपयशी ठरला असून तपासाचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.

भरणे येथील मेहता पेट्रोल पंपानजिकच्या एका मोकळय़ा जागेत अज्ञात तरूणाचा मृतदेह काही नागरिकांच्या निदर्शनास पडला. पोलीस पाटील मिलींद भालेकर यांना याबातची माहिती मिळताच त्यांनी पोलीस स्थानकात खबर दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पहाणी केली. घटनास्थळालगतच एक चूल मांडण्यात आली असून याठिकाणी रक्ताने माखलेला दगड व एक लाकूड सापडले आहे. यामुळे या तरूणाचा खूनच झाल्याचे स्पष्ट होत आहे.

त्याचा मृतदेह विच्छेदनासाठी कळंबणी उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आला आहे. अप्पर पोलीस अधीक्षक मित्तेश घट्टे यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थितीची पहाणी केली. गुरूवारी सायंकाळी उशिरापर्यंत येथील पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. यामुळे अज्ञात तरूणाच्या मृत्यूबाबत तर्कावितर्क लढवण्यात येत आहेत. पोलिसांनी मात्र तपास जारी ठेवला असून साऱया शक्यता पडताळून पाहण्यात येत आहेत.

हा अज्ञात तरूण भरणे परिसरात भंगार गोळा करण्याचे काम करत होता. मेहता पेट्रोलपंपानजीकच माने यांच्या मालकीची जागा आहे. या मोकळय़ा जागेत हा तरूण वास्तव्य करत होता. याठिकाणी तीन झोपडय़ाही आहेत. मात्र या झोपडय़ांमध्ये कोणीच वास्तव्य करत नसल्याचे पुढे आले आहे. यामुळे या अज्ञात तरूणाचा नेमका खून कोणी केला? याचा छडा लावण्याचे पोलिसांसमोर आव्हान आहे.