|Monday, June 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » ‘एक्स्ट्रीम क्लायमेट चेंज’ रोखायलाच हवा!

‘एक्स्ट्रीम क्लायमेट चेंज’ रोखायलाच हवा! 

तापमान वाढीबाबत पर्यावरण तज्ञांचे मत

35 वर्षात कोकणात तापमानाचा पारा चढताच

भाजाणावळ, वणवे, वृक्षतोडीचे दुष्परीणाम

मनोज पवार /दापोली

गेल्या 35 वर्षात झपाटय़ाने वाढलेल्या औद्योगिकीकरण, नागरिकरणामुळे व बेसुमार वृक्षतोडीमुळे कोकणातील तापमानाचा पारा चढताच राहीला आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या नोंदीनुसार दापोलीसह जिल्हय़ाच्या तापमानात गेल्या 35 वर्षात सरासरी 1.05 अंश सेल्सियसची वाढ नोंदवण्यात आली आहे. हा ‘एक्स्ट्रीम क्लायमेट चेंज’ असून तो कायम राहिला तर सजीवसृष्टीवर विपरित परिणाम होण्याची भीती पर्यावरण तज्ञांनी व्यक्त केली आहे. कोकणातील जमीन भाजणावळ व वणवे हेही तापमानवाढीला निमंत्रण देत आहेत.

जागतिक हवामान दिनाच्या पार्श्वभूमीवर विद्यापिठाच्या हवामान केंद्राला भेट दिली असता येथील कृषी हवामान शास्त्रज्ञांनी बदलते हवामान व वाढते तापमान याबाबत चिंता व्यक्त केली. 1983 साली सरासरी तापमान 30 अंश सेल्सियस होते. ते 2017 साली 31.5 अंश सेल्सियस एवढे नोंदवले गेले. यामुळे गेल्या 35 वर्षांत दापोलीच्या तापमानात तब्बल दीड अंश सेल्सियस एवढी वाढ झाली आहे. प्रती महाबळेश्वर समजल्या जाणाऱया दापोलीच्या तापमानात दरवर्षी 0.03 अंश सेल्सियस वाढ झाल्याचे स्पष्ट होत आहे. दापोली व कोकणातील इतर ठिकाणच्या तापमानात 1 ते 3 अंश सेल्सियस एवढा फरक असतो. त्यामुळे संपूर्ण कोकणातही गेल्या 35 वर्षांत असाच परिणाम पाहायला मिळतो. ग्लोबल वार्मिंगचा फटका संपूर्ण कोकणालाच बसत असल्याचे त्यांनी सांगितले.

कोकणात गेल्या दोन दशकांपासून मुंबई, पुण आदी ठिकाण्याच्या धनिकांनी मोठय़ा प्रमाणात जागा खरेदी केल्या अनेक गृह प्रकल्प उभे राहीले. यासाठी बेसुमार वृक्षतोड झाली पण त्याप्रमाणात नवे झाडे लावली गेली नाही. या असंतुलनाचा परिणाम कोकणातील तापमान वाढीवर झाला. कोकणात अजूनदेखील शास्त्रीयदृष्टय़ा चुकीची असणारी शेत भाजणावळीची पध्दत सुरू आहे. त्यामुळे उन्हाळय़ात थंडाव्याची गरज असताना भाजणावळ केल्याने जमीन व वातावरणही अधिकच तप्त होते. शिवाय वणव्यांचे दुष्टचक्र सुरूच आहे. भाजणावळ व वणव्यांमुळे वातावरणात कार्बनडायऑक्साईडचे प्रमाण प्रचंड वाढल्याने कोकणवासीयांना तापमान वाढीच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. शिवाय भाजणावळीसाठी छाटलेल्या फांद्या व शेतीचे कमी होत जणारे प्रमाणही गारवा कमी करून तापमानवाढीला निमंत्रण देणारा ठरत आहे.

जीवसृष्टीसमोर भयावह संकट

2010 ते 2011 हे वर्ष गेल्या 100 वर्षांतील सर्वाधिक उष्ण वर्ष ठरले. 2010 ते 2013 ही अत्याधिक हिमवादळे आणि थंडीची वर्षे ठरली. 2010 ते 2013 हा अत्याधिक पाऊस व वादळांचा कालखंड ठरला. त्याचबरोबर भारतात दिवस आणि रात्रीच्या तापमानातही वाढ झाली. मान्सून लहरी बनला. जागतिक हवामानातील या बदलांची आपण वेळीच दखल घेतली नाही आणि त्यासंबंधात योग्य ते खबरदारीचे उपाय योजले नाहीत तर आगामी काळात पृथ्वीवरील जीवसृष्टीसमोर भयावह संकट ओढवेल अशी भिती हवामान तज्ञांनी व्यक्त केली आहे.

पर्यावरणाचा समतोल गरजेचा

कोकणात येणाऱया मोठय़ा रासायनिक प्रकल्पांमुळे तापमानवाढीबरोबरच जैवविविधतेवरही परिणाम होण्याची भीत आहे. प्रदूषणाचा थेट परिणाम तापमान वाढीवर होतो. यामुळे कारखान्यांचे प्रदूषण व पर्यावरण यांचा समतोल राखणे गरजेचे असल्याचे मत निसर्गतज्ञ डॉ. उमेश मुंडल्ये यांनी व्यक्त केले आहे.

औद्योगिकरणाचा परिणाम

जंगले तोडून शहरे वसतात, मात्र शहरांमध्ये वृक्ष लागवड करणे शक्य नसते. अनेक राष्ट्रांनी औद्योगिकीकरणामुळे आर्थिक प्रगती केली. मात्र औद्योगिकीकरणामुळे तोड करण्यात आलेली झाडे पुन्हा लावली नाहीत. ते गरीब राष्ट्रांना वृक्ष संवर्धनासाठी पैसा देतात, मात्र आपले औद्योगिकीकरण थांबवत नाहीत. याचा परिणाम तापमान वाढीवर होतो असा देखील एक मतप्रवाह आहे.