|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » इंदिरा कॅन्टीनचा भार मनपाच्या खजिन्यावर

इंदिरा कॅन्टीनचा भार मनपाच्या खजिन्यावर 

प्रतिनिधी /बेळगाव :
निवडणूकीवर डोळा ठेवून राज्य शासनाकडून विविध योजनांची खैरात करण्यात येत आहे. अलिकडेच इंदिरा कॅन्टीन सुरू करून सर्वसामान्य नागरिकांना अल्पदारात नाष्टा आणि जेवण देण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. पण इंदिरा कॅन्टीन चालविण्यास येणाऱया खर्चाचा बोजा महापालिकेच्या खजिन्यावर पडणार आहे. प्रति जेवणासाठी मनपाला 37 रूपये मोजावे लागणार आहेत.
निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात इंदिरा कॅन्टीन सुरू करण्याची घोषणा राज्य शासनाने केली. यानुसार प्रत्येक शहरात याची उभारणी करण्यात येत आहे. बेळगाव शहरात सहा ठिकाणी इंदिरा कॅन्टीन सुरू करण्यात येणार असून यापैकी एक कॅन्टीन सुरू करण्यात आले आहे. उर्वरीत कॅन्टीन लवकरच सुरू करण्यात येणार आहेत. कॅन्टीनकरिता रेडीमेड शेड उभारण्यात आले असून राज्य शासनाकडून कॅन्टीनची उभारणी करण्यात आली आहे. पण याठिकाणी नाष्टा आणि जेवण उपलब्ध करून देण्यासाठी कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात आली आहे. नाष्टा व जेवणाच्या खर्चाचा भूर्दंड मनपाच्या खचिन्यावर पडणार आहे. याकरित मनपाचा निधी वळविण्यात आला आहे. शहरात विकासकामे राबविण्यासाठी मनपाला एसएफसी अनुदान वितरीत करण्यात येते. पण यंदा एसएफसी अनुदानाअंतर्गत मिळणारे 3 कोटी 60 लाखाचे अनुदान अद्याप मंजूर करण्यात आले नाही. सदर अनुदान इंदिरा कॅन्टीनकरिता वळविण्यात आले असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
राज्य शासनाने योजनेची घोषणा करून श्रेय लाटले, पण याकरिता येणाऱया खर्चाचा बोजा आता महापालिकेवर पडणार आहे. मनपाकडून आवश्यक सुविधा पुरविल्या जात नाहीत. मालमत्ता कराच्या माध्यमातून मनपाला 25 ते 30 कोटीचा महसुल मिळतो. पण मिळालेला महसुल शहराच्या स्वच्छतेसाठी खर्ची पडतो. यामुळे सुविधा पुरविण्यासाठी शासनाकडून मिळणाऱया अनुदानावर अवंलबून रहावे लागत आहे. यंदा मनपाच्या खजिन्यात ठण्ठणाट असल्याने बिले पेडींग आहेत. पण हा निधीदेखील अशा उपक्रमासाठी वळविण्यात येत असल्याने मनपाची आर्थिक घडी पुर्णता विस्कळली आहे.