|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » नंदनवनात दवबिंदू गोठून हिमकणांची पांढरीशुभ्र चादर

नंदनवनात दवबिंदू गोठून हिमकणांची पांढरीशुभ्र चादर 

प्रतिनिधी/ महाबळेश्वर

महाराष्ट्रात सर्वत्र उन्हाळी हंगामातील उन्हाची तीव्रता वाढू लागली असतानाच  महाराष्ट्राचे नंदनवन महाबळेश्वरमध्ये मात्र सध्या अतिशय अल्हाददायक वातावरण अनुभवायास येत आहे. येथील वेण्णालेक ते लिंगमाळा परिसरात शुक्रवारी भल्या पहाटे दवबिंदू गोठून हिमकणांची पांढरीशुभ्र चादर ठिकठिकाणी शेती व स्ट्रॉबेरी मळ्य़ामधे पाहावयास मिळाली. या परिसरात 4-5 अंश डिग्री पारा खाली उतरला होता. या निसर्गाच्या अविष्काराचा आनंद स्थानिकांसह पर्यटकांनी मोठय़ा प्रमाणावर घेतला. 

गेले 2 दिवसांपासून या नंदनवनातील सकाळ व रात्रीचे वातावरण अत्यंत अल्हाददायक होते. शुक्रवारी सकाळी तर येथील प्रसिद्ध वेण्णा तलाव ते  लिंगमाळा परिसरात पाहटे प्रचंड थंडी होती. तेथील तापमान 4-5 अंश डिग्री पर्यंत खाली उतरले होते. त्यामुळे सर्वत्र या परिसरातील स्ट्रॉबेरीचे मळे तसेच लिंगमाळा भागातील स्मृतिवनाच्या पठारावरील गवत, पाने, फुले, वेली यांच्यावर दवबिंदू गोठून हिमकणांची चादर पांघरल्याचे पाहावयास मिळाले. 

हिवाळा हंगामात अशा प्रकारे हिमकण पाहावयास मिळत असतात. मात्र उन्हाळी हंगामाच्या सुरवातीलाच अशा प्रकारे हिमकण दिसणे हे येथील अत्यंत

दुर्मिळ चित्रच म्हणावे लागेल. यावर्षी थंडीच्या मोसमामध्ये या नंदनवनात अनेक वेळा कडाक्याची थंडी पडली होती. मात्र त्या वेळेस जोरात वारेही होते त्यामुळे हिमकण पाहावयास मिळाले नाहीत. मात्र आज उन्हाळी हंगामाच्या सुरवातीलाच  अशाप्रकारे हिमकण दिसल्यामुळे समाधानाचे वातावरण आहे. 

हवामान खात्याच्या नोंदीनुसार महाबळेश्वर शहराचे किमान तपमान सुमारे 10.0 डिग्री सेल्सियस होते तर वेण्णा तलाव परिसरात ते 4-5 अंश डिग्रीपेक्षा कमी असल्याचे जाणवत होते .दरम्यान 4 मार्च 2015 रोजी व मागील वर्षी 13 मार्च 2017 रोजी महाराष्ट्रात सर्वत्र होळीचा सण साजरा होत असतानाच अशा प्रकाचे हिमकण महाबळेश्वरमध्ये पाहावयास मिळाले होते. त्याचाही आनंद त्यावेळी स्थानिकांसहा पर्यटंकांनी मनमुरादपणे लुटला.