|Saturday, July 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » आणखी 22 खाण आंदोलकांना समन्स

आणखी 22 खाण आंदोलकांना समन्स 

 

प्रतिनिधी/ पणजी

खाण अवलंबितानी आंदोलनाच्या नावाखाली गेल्या सोमवारी पणजीत धिंगाणा घातला. तब्बल पाच तास महामार्ग बंद केला. शाळकरी विद्यार्थ्यांसह सर्वसामान्य जनतेला वेठीस धरले. तोडफोड केली. त्या प्रकरणाचा पोलीस कसून तपास करीत आहेत. दर दिवशी संशयितांच्या संख्येत वाढ होत असून ओळख पटलेल्यांना पोलीस समन्स बजावत आहेत. शनिवारी आणखी 22 आंदोलकांना समन्स बजावण्यात आले आहेत. त्यामुळे समन्स बजावण्यात आलेल्यांची संख्या आता 63 वर पोहोचली आहे. त्यापैकी 18 जणांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केले आहेत.

ज्या संशयितांना समन्स बजावून दि. 22 रोजी चौकशीसाठी बोलविले होते ते आले नसल्याने त्यांना त्वरित ताब्यात घेण्यात यावे, असा आदेश संबंधित पोलीस स्थानकांना देण्यात आला आहे. हे संशयित फोतोर्डा, ओल्ड गोवा, फोंडा, कुडचडे, साळगाव, वेर्णा, वाळपई व कळंगूट पोलीस स्थानकांच्या हद्दीतील असून या पोलीस स्थानकांना आदेश जारी करण्यात आला आहे. हा आदेश शुक्रवारी जारी करण्यात आला होता मात्र शनिवार उशीरांपर्यंत कुणालाही ताब्यात घेण्यात आले नव्हते.

शनिवारी समन्स बजावण्यात आलेल्या आंदोलकांमध्ये संतोष भगत (साखळी), श्रीकांत धारगळकर (लामगाव डिचोली), शिवानंद गावंडळकर (पाळी), बबन भगत, भरत गवस (नावेली साखळी), लॉरेन्स ब्रागांझा (वझरी साखळी), उदय बेतकेकर (डिंगणे साखळी), सुंदर नाईक (मायणा सांखळी), शिवानंद पेडणेकर (हरवळे), सुभाष फोंडेकर (सुर्ल पाळी), शेखर आमोणकर (डिचोली), रमेश सिनारी (कुडणे साखळी), गीताली नाईक (नावेली साखळी), वासुदेव यादव (साखळी), रघुनाथ मळीक (कुडणे साखळी) व महेश गावस (पाळी) यांचा समावेश आहे. त्यांना सोमवारी दुपारी 4 वाजता चौकशीसाठी हजर राहण्यास बजावले आहे. अजित कुराणे, सुरेश देसाई (दोघेजण होंडा साखळी), पांडुरंग परब, रामानाथ च्यारी, प्रशांत नागवेकर, रुपेश परब (चौघेजण पिसुर्ले) या सहाजणांना सोमवार 26 रोजी दुपारी 11 वाजता चौकशीसाठी बोलविण्यात आले आहे. एकूण 22 आंदोलकांना शनिवारी समन्स बजावण्यात आला आहे.

आतापर्यंत एकूण 63 जणांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. शुक्रवारी समन्स बजावण्यात आलेल्या संशयितामध्ये टॅक्सी चालक संघटनेचे पदाधिकारी बाप्पा कोरगावकर (नेरुल), विनायक नानोस्कर यांच्यासह राजू कोळंबकर, दिलीप रिवणकर, गुरुदास नाईक, रॅमी फर्नांडिस, सूर्यकांत नाईक, आशिश नाईक, बस्त्यांव सीमॉईस, प्रितीदास नाईक, प्रतीत नाईक सर्वजण रिवण येथील आहेत. या सर्वजणांना शनिवारी चौकशीसाठी बोलविण्यात आले होते.

खाण अवलंबितांनी सोमवारी पणजीत मोर्चा काढून जो धुडगूस घातला होता. तसेच तब्बल पाचतास महामार्ग बंद केला होता. या प्रकरणाची पोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे. 17 जणांना समन्स जारी करून त्यांना उलट तपासणीसाठी काल दि. 22 रोजी बोलविण्यात आले होते. मात्र एकही संशयित दिलेल्या वेळेत चौकशीसाठी उपस्थित राहिला नाही. संशयितांच्या विरोधात विविध कलमाखाली गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सर्व संशयिता विरोधात पणजी पोलिसांनी भादंसं 143, 147, 148, 353 323, 336, 427, 504, 506(2), 149 कलम 8बी तसेच महामार्ग बंद करणे कायदा 1956 खाली गुन्हा नेंद केला आहे.

एकूण संशयितापैकी 18 आंदोलकांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. यात हरिश्चंद्र मेलवानी, प्रमोद सावंत, विनोद पेडणेकर, नारायण कुडणेकर, दोमोदर बोरकर, प्रशांत धारगळकर, नुरमोहमद शेख, रवी नाईक, नितीन शिवडेकर, नोबेल डायस, अशिश नाईक, दिलीप देवीदास, प्रदीप नाईक, राजेश नाईक, राजू देवीदास, सूर्या नाईक, गुरुदास नाईक व सेबेस्त्यांव सिमोईस यांचा समावेश आहे. ज्यांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे.