|Tuesday, July 16, 2019
You are here: Home » मनोरंजन » छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्याची आगळीवेगळी गोष्ट

छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्याची आगळीवेगळी गोष्ट 

आपण फकस्त लडायचं आपल्या राजांसाठी… आन् स्वराज्यासाठी…! या एकाच ध्येयाने हजारो हात स्वराज्य स्थापनेसाठी शिवरायांच्या मदतीला आले होते. ‘रयतेचा राजा’ म्हणून ओळखल्या जाणाऱया शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची महती वेगळी सांगण्याची गरज नाही. मात्र, महाराजांच्या स्वराज्याच्या स्वप्नासाठी अनेकांनी मोलाचे योगदान दिले आहे. पन्हाळा किल्ला जिंकण्यासाठी कोंडाजी फर्जंद या योद्धय़ाने आपल्या जीवाची बाजी लावत मूठभर मावळय़ांना सोबत घेत किल्ले पन्हाळय़ावर यशस्वी चढाई केली होती. हा सगळा रोमांचकारी इतिहास 11 मे ला फर्जंद या मराठी चित्रपटाद्वारे आपल्या समोर उलगडणार आहे. तत्पूर्वी फर्जंद चित्रपटाचा पहिला टीझर गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर प्रदर्शित झाला आहे.

 फर्जंद युद्धपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटाविषयीची प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहचली होती. यामध्ये शिवाजी महाराजांची भूमिका कोण साकारणार? पोस्टरमध्ये दिसणारा बलदंड शरीरयष्टीचा तो युवक नेमका कोण? असे असंख्य प्रश्न प्रेक्षकांना पडले होते. यासारख्या बऱयाच प्रश्नांची उत्तरे चित्रपटाच्या पहिल्या टीझरमधून प्रेक्षकांना मिळाली आहेत. शिवाजी महाराजांच्या भूमिकेत असलेला अभिनेता चिन्मय मांडलेकर तसेच रांगडय़ा युवकाची झलक प्रेक्षकांना पहिल्या टीझरमधून पाहायला मिळाली असून अल्पावधीतच या टीझरने कमाल केली आहे. या टीझरचे हिटस् सातत्याने वाढत असून प्रेक्षकांच्या पसंतीची पावती टीझरला मिळाली आहे. कोंडाजी फर्जंद आणि मावळय़ांनी किल्ले पन्हाळय़ावर यशस्वी चढाई केली होती. या धाडसाची गाथा, दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित फर्जंद या चित्रपटाद्वारे उलगडली जाणार असून आपणास पुन्हा एकदा इतिहासाचे साक्षीदार होण्याची संधी मिळणार आहे. मराठीतील अनेक दिग्गज कलाकार या चित्रपटामध्ये आहेत.

स्वामी समर्थ मुव्हीजची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन दिग्पाल लांजेकर यांनी केले आहे. अनिरबान सरकार या चित्रपटाचे निर्माते असून संदीप जाधव, महेश जाऊरकर, स्वप्नील पोतदार हे या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. छायांकन केदार गायकवाड यांचे असून संकलन प्रमोद कहार यांचे आहे. गीते दिग्पाल लांजेकर व क्षितीज पटवर्धन यांनी लिहिली आहेत. संगीत अमितराज तर पार्श्वसंगीत केदार दिवेकर यांचे आहे. आदर्श शिंदे आणि वैशाली सामंत यांनी यातील गीते स्वरबद्ध केली आहेत. साहस दृश्ये प्रशांत नाईक यांची आहेत. कलादिग्दर्शन नितीन चंद्रकांत देसाई यांचे तर ध्वनीलेखन निखील लांजेकर यांनी केले आहे. कार्यकारी निर्माते उत्कर्ष जाधव आहेत.