|Monday, January 21, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामाला वेग

बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामाला वेग 

पूल-भुयारांच्या डिझायनिंगचे 80 टक्के काम पूर्ण : महाराष्ट्रात भूमी अधिग्रहण प्रक्रियेला प्रारंभ

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

 भारताच्या पहिल्या हायस्पीड बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम वेगाने सुरू आहे. ही बुलेट ट्रेन अहमदाबाद ते मुंबईदरम्यानचे 508 किलोमीटरचे अंतर कापणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या कामकाजाची जबाबदारी नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशनला (एनएचएसआरसी) सोपविण्यात आली आहे. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक अचल खरे यांनी हायस्पीड कॉरिडॉरच्या पूल आणि भुयारांच्या डिझाइनचे काम 80 टक्के पूर्ण झाल्याची माहिती दिली. महाराष्ट्रातील भूमी अधिग्रहणाची प्रक्रिया देखील सुरू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

मागील वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंजो अबे यांनी या प्रकल्पाच्या कामाचा शुभारंभ केला होता. 2022 पर्यंत भारतातील पहिली बुलेट ट्रेन धावू लागणार आहे.

हायस्पीड कॉरिडॉरचे पूल आणि भुयारांचे डिझाइन दिल्ली, मुंबई आणि जपानच्या कंपन्यांनी तयार केले असून याकरता सर्वेक्षण आणि मृदा परीक्षण सुरू आहे. प्रस्तावित कॉरिडॉर मुंबईच्या बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स येथून सुरू होत अहमदाबादच्या साबरमती रेल्वे स्थानकावर संपणार आहे. प्राथमिक टप्प्यात महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये भूमी अधिग्रहणाची प्रक्रिया देखील सुरू करण्यात आली आहे. बुलेट ट्रेनचा मार्ग महाराष्ट्राच्या 108 गावांमधून जाणार आहे. अधिग्रहणासाठी पालघर जिल्हय़ातील 17 गावांच्या शेतकऱयांना नोटीस देण्यात आली. या शेतकऱयांना बाजारमूल्यानुसार भरपाई दिली जाईल आणि याकरता 10 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

भूकंपरोधक मार्ग

कंपनीनुसार बुलेट ट्रेनचा पूर्ण मार्ग भूकंपरोधक असणार असून याकरता सीस्मोमीटर लावण्यात येतील. त्याचबरोबर वाऱयाची दिशा आणि वेग जाणून घेण्याकरता विंड मीटर सिस्टीम बसविली जाणार आहे. ट्रेनचा वेग वाऱयाच्या वेगावर निर्भर राहणार आहे. वारा 30 मीटर प्रतिसेकंदाच्या वेगाने वाहू लागल्यास ट्रेन रोखली जाणार आहे.

त्वरित मदत

508 किलोमीटर लांबीच्या ट्रेन कॉरिडॉरमध्ये अनेक सुविधा उभारल्या जाणार आहेत. परंतु दुर्घटनेच्या स्थितीत लोकांना बाहेर काढण्यासाठी विशेष यंत्रणा उभारली जाईल. आपत्कालीन स्थितीत 10 मिनिटांच्या आत प्रवाशांपर्यंत मदत पोहोचविली जाणार आहे.

प्रतितास 320 किमीचा वेग

बुलेट ट्रेनचा कमाल वेग 320 किलोमीटर प्रतितास इतका असणार आहे. प्रत्येकी 320 सेकंदांमध्ये ट्रेन 18 किलोमीटर अंतर कापणार आहे. बांद्रा कॉम्प्लेक्सकडून ठाणे येथे पोहोचण्यासाठी बुलेट ट्रेनला 10 तर पालघरसाठी 24 मिनिटांचा कालावधी लागणार आहे.

प्रतिदिनी 70 फेऱया

मुंबई आणि अहमदाबाददरम्यान अप-डाउन ट्रकवर बुलेट ट्रेन प्रतिदिनी 35-35 (एकूण 70) फेऱया मारणार आहे. या फेऱयांच्या माध्यमातून 40 हजार प्रवासी प्रतिदिन बुलेट ट्रेनमधून प्रवास करतील असा अनुमान आहे. बुलेट ट्रेनच्या शुभारंभाअगोदर 10 किलोमीटरची प्रायोगिक चाचणी घेतली जाणार
आहे.

Related posts: