|Monday, July 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » रॉकेल ओतून दाम्पत्याचा आत्मदहनाचा प्रयत्न

रॉकेल ओतून दाम्पत्याचा आत्मदहनाचा प्रयत्न 

प्रतिनिधी/ सांगली

गावातील धनगदांडग्यांनी जमीन बळकावली, याबाबत पोलीस व महसूल विभागाकडे दाद मागूनही न्याय मिळत नसल्याच्या आरोप करत करोली एम (ता. मिरज) येथील मनोहर घोडके व शालन घोडके या दाम्पत्याने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात अंगावर रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. भर दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. पोलिसांनी प्रसंगावधान राखत तात्काळ घोडके दाम्पत्याला ताब्यात घेतल्याने मोठा अनर्थ टळला. दरम्यान, या घटनेमुळे जिल्हाधिकारी कार्यालयात चांगलीच पळापळ झाली.

पीडित घोडके कुटुंब गेल्या अनेक महिन्यापासून मिरज ग्रामीण पोलीस ठाणे ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत न्यायासाठी हेलपाटे मारत आहे. घोडके कुटुंबाची करोली (एम) येथे असणारी शेतजमीन भाऊ नंदकुमार घोडके यांनी मिरज तहसीलदार यांना चुकीची माहिती देत स्वतःच्या नावावर करुन घेतली आहे. त्यानंतर ती जमीन गावातील धनदांडग्या पाटील कुटुंबाला विकली आहे. दरम्यान, सातबारा वरील नाव कमी करताना नंदकुमार घोडके यांनी कोणतीही नोटीस दिली नाही. याबाबत मिरज व मुंबई उच्च न्यायालयात खटला सुरु आहे. याबाबत मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करुनही पोलिसांनी दखल घेतली नाही. याशिवाय जिल्हाधिकारी यांनाही याबाबत निवेदन देऊनही न्याय मिळत नसल्याने सोमवारी दुपारी घोडके दाम्पत्याने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात स्वतःवर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला.

भर दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या प्रकारामुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱयांनी एकच पळापळ झाली. पोलिसांनी प्रसंगावधान राखत घोडके दाम्पत्याच्या हातातून रॉकेलची बाटली व काडेपेटी काढून घेतल्याने पुढील अनर्थ टळला. दरम्यान, याबाबत बोलताना मनोहर घोडके म्हणाले, याबाबत वारंवार तक्रार करुनही कोणतीच कार्यवाही केली जात नाही. या प्रकरणाची चौकशी करुन नंदकुमार घोडके यांच्यासह दमदाटी करणाऱया पाटील कुटुंबावर गुन्हे दाखल करावेत, त्यांना तात्काळ अटक करावी. दरम्यान, या प्रकरणी घोडके दाम्पत्याला विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवासी उपजिल्हाधिकारी त्रिगुण कुलकर्णी यांनी याप्रकरणात लक्ष घालून घोडके कुटुंबाला न्याय देण्यात येईल असे सांगितले.