|Friday, July 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » सेसा कंपनी कामगारांना पगार देणार

सेसा कंपनी कामगारांना पगार देणार 

प्रतिनिधी/ डिचोली

सेसा कंपनी आपल्या कामगारांना पूर्ण पगार देणार, कामगारांना सध्या खाण प्रक्रिया बंद असल्याने व कामच नसल्याने घरी बसण्याचा सल्ला कंपनीने दिलेला आहे. कंपनी कामगारांविषयी पुढील निर्णय घेण्यापूर्वी कामगारांशी सविस्तर चर्चा करणार व त्यांना विश्वासात घेऊनच निर्णय घेणार, अशी ग्वाही सेसा कंपनीच्यामार्फत आज डिचोली उपजिल्हाधिकारी प्रदीप नाईक यांच्यासमोर कंपनीचे खाण व्यवस्थापक तथा उत्तर गोवा प्रमुख संतोष मांद्रेकर यांनी दिली. सदर ग्वाही उपजिल्हाधिकाऱयांच्या नोंदवहीत (मिनिटस् बुकमध्ये) नोंद झालेली आहे.

डिचोली बरोबरच सुर्ल, कोडली व सोनशी या भागातील सेसा कंपनीच्या कामगारांना कामावर न येण्याची नोटीस कंपनीने बजावल्यानंतर कामगार संघटनेने आपल्या भवितव्यासाठी विविध मार्गाने संघर्ष सुरु केला तसेच धबधबा डिचोली येथील गेटवर दररोज शांततेत कामगारांचे धरणे सुरुच आहे.

याच विषयासंदर्भात गेल्या शुक्रवारी डिचोली उपजिल्हाधिकारी प्रदीप नाईक यांनी कंपनी अधिकारी, कामगार संघटना, पोलीस निरीक्षक यांची संयुक्त बैठक घेतली होती. या बैठकीत कामगार संघटनेच्या पदाधिकाऱयांनी कंपनीने आम्हाला कामावरुन कमी करणार नाही असे लेखी स्वरुपात द्यावे तसेच कामगारांना कामाचे संरक्षण द्यावे, अशी मागणी करताना उपजिल्हाधिकाऱयांना या प्रकरणात गंभीरतेने लक्ष घालण्याची मागणी केली होती. त्यावर कंपनी अधिकारी संतोष मांद्रेकर यांनी आपण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱयांशी बोलून सोमवारी कळवतो, असे सांगितले होते. त्यानुसार सोमवार दि. 26 रोजी सकाळी डिचोली उपजिल्हाधिकारी कार्यालयात संयुक्त बैठक झाली.

या बैठकीला उपजिल्हाधिकारी प्रदीप नाईक, पोलीस निरीक्षक संजय दळवी, कामगार संघटनेचे अध्यक्ष निलेश कारबोटकर, सचिव किशोर लोकरे, खजिनदार नारायण गावकर, इंद्राकांत फाळकर, महेश होबळे, देऊ गावकर, अनिल सालेलकर, बाबुसो कारबोटकर, कायदेशीर सल्लागार अजय प्रभुगावकर व इतरांची उपस्थिती होती.

यावेळी सेसा कंपनीचे अधिकारी संतोष मांद्रेकर यांनी, कंपनी कामगारांना कामावरुन कमी करणार नाही. कामगारांना पगार देणार. कामगारांविषयी काही निर्णय घ्यायचे असल्यास कामगारांशी चर्चा केली जाणार आहे. त्यांना विश्वासात घेणार. सध्या काम सुरु नसल्याने कामगारांना घरी बसण्याची सूचना केलेली आहे. तसेच खर्चावर नियंत्रण राहावे यासाठी कँटीन व वाहतूक व्यवहार बंद करण्यात आलेली आहे, असे सांगितले. कोणत्याही प्रकारचे लेखी पत्र यावेळी कंपनीचे अधिकारी संतोष मांद्रेकर यांनी सादर केले नाही. मात्र सदर संपूर्ण ग्वाही कंपनीच्या बाजूने उपजिल्हाधिकाऱयांच्या नोंदवहीत नोंद करण्यात आलेल्या आहे. त्यामुळे कामगार संघटनेने सदर मिनिटस्च्या प्रती आपल्याकडे घेतलेल्या आहेत.

या प्रकरणी कामगार संघटनेने कामगार आयोगाकडे दाद मागितली होती. त्या अनुषंगाने आज मंगळवार दि. 27 मार्च रोजी सकाळी कामगार आयोगाने कामगारांना भेटीसाठी बोलावले आहे. त्यामुळे कामगार संघटना आयोगाच्या भेटीसाठी आज जाणार आहे.