|Monday, July 22, 2019
You are here: Home » क्रिडा » डॅरेन लेहमन, स्टीव्ह स्मिथवर टांगती तलवार

डॅरेन लेहमन, स्टीव्ह स्मिथवर टांगती तलवार 

क्रिकेट ऑस्ट्रेलिया आज घोषणा करण्याची शक्यता, चौकशी मोहीम अंतिम टप्प्यात,

लेहमनचे मौन मात्र कायम, स्वतःच पायउतार होण्याचाही विचार

वृत्तसंस्था / सिडनी

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने बॉल टेम्परिंगचे प्रकरण चांगलेच लावून धरले असल्याने ऑस्ट्रेलियन प्रशिक्षक डॅरेन लेहमन व कर्णधार स्टीव्ह स्मिथ यांना लवकरच थेट पदावरुन डच्चू तसेच सक्तीच्या निलंबनाला सामोरे जावे लागू शकते, असे स्पष्ट संकेत आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाच्या प्रतिष्ठेचा प्रश्न निर्माण झाला असल्याने अगदी ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांनी देखील क्रिकेट ऑस्ट्रेलियाला सक्तीने कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. दरम्यान, ऑस्ट्रेलियन प्रशिक्षक डॅरेन लेहमन याबाबत अद्याप मौन बाळगून असला तरी क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून कारवाई होण्यापूर्वीच तो स्वतः देखील राजीनामा देण्याची शक्यता चर्चेत आहे.

क्रिकेट ऑस्ट्रेलिया स्थानिक प्रमाणवेळेनुसार, बुधवारी सकाळी कारवाईची घोषणा करेल, असे सध्याचे संकेत असून यात कर्णधार स्टीव्ह स्मिथ व त्याचा सहकारी उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर यांच्यावर किमान एका वर्षाच्या बंदीची शक्यता विचाराधीन आहे. स्मिथला यापूर्वीच एका कसोटीतून निलंबित केले गेले असून त्याला पूर्ण 100 टक्के मानधन कपातीचा दंड ठोठावण्यात आला आहे. यामुळे, स्टीव्ह स्मिथ दि. 30 पासून खेळवल्या जाणाऱया चौथ्या व शेवटच्या कसोटीत खेळणार नसल्याचे स्पष्ट आहे. पण, क्रिकेट ऑस्ट्रेलियाने स्वतंत्र चौकशी करत या घटनेची आणखी गंभीर दखल घेतली आहे.

लेहमन ठळक चर्चेत

ऑस्ट्रेलियन प्रशिक्षक डॅरेन लेहमन अगदी पहिल्या टप्प्यापासून मौन बाळगून असला तरी त्याने प्रशिक्षकपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला असून तो लवकरच याची घोषणा करेल, असा दावा ब्रिटनमधील डेली टेलिग्राफने केला आहे. ऑस्ट्रेलियन संघाच्या प्रशिक्षकपदासाठी आता जस्टीन लँगरसह रिकी पाँटिंगचे नावही चर्चेत आहे. 2013 मध्ये तत्कालीन प्रशिक्षक मिकी आर्थरची उचलबांगडी झाल्यानंतर लेहमनची या पदावर वर्णी लागली. पण, आता बॅन्क्रॉफ्टने चेंडू कुरतडल्याचे निदर्शनास आले व त्यानंतर हा पूर्ण संघाचा गेमप्लॅन असल्याचे स्पष्ट झाले. साहजिकच, त्याचे पहिले खापर कर्णधार या नात्याने स्टीव्ह स्मिथ व प्रशिक्षक या नात्याने डॅरेन लेहमनवर फुटणार हे देखील निश्चित झाले.

ऑस्ट्रेलियन चाहत्यांच्या संतप्त प्रतिक्रिया

बॅन्क्रॉफ्टसारख्या नवख्या खेळाडूच्या माध्यमातून ऑस्ट्रेलियन कर्णधार व उपकर्णधाराचीच ही कुटनीती असल्याने ऑस्ट्रेलियन चाहत्यांमधून अतिशय संतप्त प्रतिक्रिया उमटत राहिल्या आहेत. वास्तविक, ऑस्ट्रेलियन संघातील वरिष्ठ खेळाडूंमध्ये जोश हॅझलवूड व मिशेल स्टार्क यांचाही आवर्जून समावेश होतो. पण, जे वादंग घडले, त्यावरुन हे दोघे गोलंदाज देखील संतप्त असल्याची चर्चा आहे. ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंच्या संघटनेने आपला या कुटनीतीत सहभाग नसल्याचे स्पष्ट करावे, अशी विनंती हे दोघे लवकरच करतील, अशीही शक्यता आहे.

या सर्व गंभीर प्रकरणाची व्याप्ती जागतिक क्रिकेटची दिशा ठरवणाऱया अगदी मेरिलबोन क्रिकेट क्लबपर्यंत पोहोचली असून त्यांनी ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी आपल्या मानसिकतेत व्यापक फेरबदल करण्याची गरज बोलून दाखवली आहे.