|Sunday, August 25, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » खेडमधील पाणी टंचाईवर ‘खासगी ’ उतारा!

खेडमधील पाणी टंचाईवर ‘खासगी ’ उतारा! 

शासकीय टँकर अभावी प्रशासनावर नामुष्की

जिल्हय़ातील पहिला टँकर यंदाही खेडमध्येच

खोपी, जांभुळवाडी, ढेबेवाडीला पाणीपुरवठा सुरू

राजू चव्हाण /खेड

दरवर्षीप्रमाणे यंदाही पाण्याचा पहिला टँकर खेड तालुक्यातच धावला असून शासकीय टँकर उपलब्ध नसल्याने खासगी टँकरद्वारे ग्रामस्थांची तहान भागवण्याची नामुष्की प्रशासनावर आली आहे. प्रचंड पाणी टंचाईचा सामना करणाऱया करणाऱया चिंचवली-ढेबेवाडीसह खोपी-रामजीवाडी, जांभूळवाडीमध्ये बुधवारी खासगी टँकरद्वारे पाणीपुरव­ठा सुरू करण्यात आला आहे. दरम्यान कित्येक वर्षांपासून पाणीटंचाईचा सामना कराव्या लागणाऱया या गाव-वाडय़ावर दरवर्षी लाखो रूपये खर्च करूनही मुळ प्रश्न कायमच राहीला असल्याने नाराजी व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे तीन तीन मंत्री असतानाही खेडवरील टंचाईग्रस्त तालुक्याचा शिक्का कायम राहीला आहे.

उपलब्ध जलस्त्रोत आटल्याने पाण्यासाठी वणवण करणाऱया चिंचवली-ढेबेवाडी येथील ग्रामस्थांनी टँकरच्या पाण्यासाठी प्रशासनाकडे पहिला अर्ज दाखल केला. यापाठोपाठ खोपी-रामजीवाडीचा अर्ज दाखल केला होता. या दोन्ही गाव-वाडय़ांमध्ये पाण्याचे भीषण दुर्भिक्ष्य निर्माण झाले असून प्रशासनाने केलेल्या सर्वेक्षणानंतर या 2 गाव-वाडय़ांना तातडीने पाणीपुरवठा करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र प्रशासनाकडील दोन्ही टँकर नादुरूस्त असल्याने चिपळूण व दापोली येथे टँकरची मागणी करण्यात आली होती. मात्र या दोन्ही तालुक्यांनी त्यास असमर्थता दर्शवल्याने पाणीपुरवठा करण्याच आव्हान निर्माण झाले होते.

या गाव-वाडय़ांपाठोपाठ देवसडे येथील 6 वाडय़ा व कुळवंडी-शिंदेवाडी, मोरवंडे-मधलीवाडी या गाव-वाडय़ांनीही टँकरच्या पाण्यासाठी अर्ज केले आहेत. तालुक्यातील टंचाईग्रस्त गाव-वाडय़ांची संख्या वाढतच चालली असून शासन दरबारी ग्रामस्थांचे खेटे सुरू आहेत. टँकरच्या पाण्यासाठी अर्ज दाखल करून 20 दिवसांचा कालावधी लोटूनही टँकरची उपलब्धता नसल्याने पाणीपुरवठय़ाचा प्रश्न गंभीर बनत चालला होता.

शासकीय टँकरसाठी प्रशासनाने जिल्हा पातळीवरही पाठपुरावा केला. मात्र अद्यापही टँकर उपलब्ध न झाल्याने खासगी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार मंगळवारी 4 खासगी वाहनचालकांची बैठक घेऊन त्यांचे टँकर अधिग्रहित करण्यात आले. बुधवारी दुपारी 2 वाजता खोपी-रामजीवाडी, जांभूळवाडी व चिंचवली-ढेबेवाडी येथे पाण्याचा खासगी टँकर पोहचताच ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास टाकला.

टंचाईचा शिक्का पुसणार कधी?

दरवर्षी जिल्ह्यातील पहिला टँकर खेड तालुक्यातूनच धावत असून टंचाईग्रस्त गाव-वाडय़ांही त्याच आहेत. गतवर्षी 21 मार्चला जिल्ह्यातील पहिला टँकर चिंचवली-ढेबेवाडीतच धावला होता. यंदाही चिंचवली-ढेबेवाडीसह खोपी-रामजीवाडी, जांभूळवाडीत पहिला टँकर धावला आहे. दरवर्षी टंचाई आराखडय़ासाठी लाखोंची तरतूद केली जाते, तरीही गावांच्या तहानेचा प्रश्न कायम आहे. खेड तालुक्यातील तीन नेते मंत्रीपदावर असतानाही पाणीपुरवठय़ाची समस्या जैसे थेच आहे.