|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » ‘प्लाजमा तंत्रज्ञाना’चे अगोदर प्रात्यक्षिक सादर करा सिद्धनाथ बुयांव यांची मागणी

‘प्लाजमा तंत्रज्ञाना’चे अगोदर प्रात्यक्षिक सादर करा सिद्धनाथ बुयांव यांची मागणी 

प्रतिनिधी/ मडगाव

सोनसोडो कचरा यार्डातील कचऱयावर प्रक्रिया करण्यासाठी आत्ता प्लाजमा तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार असल्याची माहिती नगरनियोजनमंत्री विजय सरदेसाई यांनी केली आहे. मात्र, या तंत्रज्ञानाची अगोदर मोफत प्रात्यक्षिके सादर करावी अशी मागणी सोनसोडो कचरा यार्ड जवळ, अमृतनगर-फातोर्डा येथे राहणारे कलाकार सिद्धनाथ बुयांव यांनी केली आहे.

सोनसोडय़ावरील कचऱयावर प्रक्रिया करण्यासाठी, या पूर्वी अनेकदा प्रयत्न झाले. मात्र, या प्रयत्नाना यश आलेले नाही. उलट लोकांची दिशाभूल करण्यात आली, सोनसोडय़ावर सुमारे 60,000 घनमीटर कचरा साचलेला आहे. या कचऱयावर प्रक्रिया केली जात असल्याचे सांगून लोकांची घोर फसवणूक करण्यात आलेली आहे. या पूर्वी केलेले सर्व प्रयत्न फसल्यानंतर आत्ता नव्याने प्लाजमा तंत्रज्ञानाचा वापर केला केला जाणार आहे.

प्लाजमा तंत्रज्ञानाचा वापर करण्यासापूर्वी त्याचे प्रात्यक्षिक जनेतला सादर करावे अशी मागणी कलाकार सिद्धनाथ बुयांव यांनी केली आहे. प्लाजमा तंत्रज्ञानाला गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाने मान्यता दिली असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, या तंत्रज्ञानाचा वापर करून कचऱयावर प्रक्रिया केल्यास वायू उत्सर्जन होण्याची शक्यता आहे. हा वायू धोकादायक असण्याची शक्यता नाकारली जात नाही. सोनसोडो परिसरात लोकवस्ती असून एक हायस्कूल देखील कार्यरत आहे. त्यामुळे या वायू उत्सर्जनाचा धोका नेमका किती आहे हे स्पष्ट होणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे.

एप्रिल 2017 मध्ये मंत्री विजय सरदेसाई यांनी घाई गडबडीत यंत्र सामुग्री आणून मे 2017 पर्यंत सर्व कचऱयावर प्रक्रिया केली जाणार असल्याची घोषणा केली होती. पण, प्रत्यक्षात या ठिकाणी काहीच झालेले नाही. कचऱयाचे ढिग सातत्याने वाढत आहे. या पूर्वी अनेकांनी कचऱयावर प्रक्रिया करण्यासाठी पुढाकार घेतला, पण तो व्यर्थ ठरला.

प्लासमा तंत्रज्ञानाचा या पूर्वी गोवा वैद्यकीय महाविद्यालयात वैद्यकीय कचऱयावर प्रक्रिया करण्यासाठी वापर करण्यात आला होता. मात्र, या तंत्रज्ञानाद्वारे वैद्यकीय कचऱयावर योग्य प्रक्रिया होऊ शकली नव्हती. त्याच बरोबर त्याला सीपीसीबीची मान्यता नव्हती. त्यामुळे हे तंत्रज्ञान कितपत उपयुक्त ठरणार हा सवाल उपस्थित होत असल्याचे बुयांव यांनी म्हटले आहे.

जर प्लासमा तंत्रज्ञनाचा प्रत्यक्ष वापर करण्यापूर्वी प्रात्यक्षिके सादर केली व हे तंत्रज्ञान चांगले असेल तर आपण राजकीय हवेदावे बाजूला ठेऊन पूर्ण पाठिंबा देण्यास तयार असल्याचे सिद्धनाथ बुयांव यांनी स्पष्ट केले आहे.