|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » सीरियाबद्दल ट्रम्प यांचा मोठा निर्णय

सीरियाबद्दल ट्रम्प यांचा मोठा निर्णय 

युद्धग्रस्त देशातून बाहेर पडणार अमेरिकेचे सैन्य

वृत्तसंस्था/  वॉशिंग्टन

 गृहयुद्धात होरपळत असलेल्या सीरियासाठी एक चांगले वृत्त समोर आले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लवकरच अमेरिकेचे सैन्य सीरियातून बाहेर पडणार असल्याची घोषणा केली आहे. सीरियात अमेरिकेच्या नेतृत्वाखालील आघाडी तसेच रशियाच्या नेतृत्वाखालील आघाडीदरम्यान सुरू असलेल्या चढाओढीमुळे स्थिती बिघडली आहे. अशा स्थितीत अमेरिकेने माघार घेतल्यास काही प्रमाणात संघर्ष कमी होणार आहे.

दहशतवादी आणि सरकारविरोधी संघटनांना अमेरिका आर्थिक मदत करत असल्याचा आरोप सीरियाने अनेकदा केला आहे. सीरियात मागील काही वर्षांपासून सुरू असलेल्या युद्धाने त्रिकोणी स्वरुप घेतले आहे. यात सीरियन सैन्याला रशिया समर्थन देत आहे. तर अमेरिका आणि सरकारविरोधी बंडखोर दुसऱया बाजूला आहेत.

 

तर तिसऱया बाजूला दहशतवादी संघटना आहेत. तीन बाजूने सुरू असलेल्या या युद्धात प्रतिदिन शेकडो नागरिकांना जीव गमवावा लागत आहे. सीरियात शांतता प्रस्थापित करण्याच्या प्रक्रियेत अमेरिकेला सर्वात मोठा अडथळा मानले जाते. परंतु आता अमेरिकेने माघार घेतल्यास येथे शांतता प्रस्थापित करण्याचा मार्ग खुला होऊ शकतो.

सीरियाचे नागरिक आता स्वतःच तोडगा काढतील. मध्यपूर्वेत अमेरिकेने आतापर्यंत अब्जावधींची रक्कम खर्च केली आहे. परंतु त्याच्या बदल्यात काहीच मिळाले नाही असे ट्रम्प यांनी ओहियो येथील एका सभेत बोलताना म्हटले. अमेरिकेचे सैन्य सीरियातून कधी बाहेर पडणार हे मात्र त्यांनी स्पष्ट केले नाही. याचबरोबर आयएसच्या विरोधात सुरू असलेली वायूदलाची मोहीम देखील रोखली आहे.

अमेरिकेचे सैन्य

उत्तर सीरियामध्ये अमेरिकेचे सैन्य असून आयएसच्या विरोधातील लढय़ासाठी  कुर्दिश फायटर्सना मदत करत आहे. कुर्दिश शहर मांबिजमध्ये अमेरिकेचे सैन्य असल्याचे आणि तुर्कस्तान आणि अमेरिकेदरम्यान करार झाल्याचे वृत्त एका प्रसारमाध्यमाने अलिकडेच दिले होते.