|Monday, July 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » फोंडय़ात ट्रक टर्मिनलची नितांत गरज

फोंडय़ात ट्रक टर्मिनलची नितांत गरज 

प्रतिनिधी/ फोंडा

गोव्याचे मध्यवर्ती ठिकाण असलेला फोंडा तालुक्यामध्ये मालवाहू व अवजड वाहनांची रेलचेल पाहता याठिकाणी ट्रक टर्मिनल्सची नितांत गरज भासू लागली आहे. एकूण चार औद्योगिक वसाहतींचा समावेश असलेल्या फोंडा परिसरात मोठय़ासंख्येने मालवाहू ट्रकांची रेलचेल असते. राष्ट्रीय परवाना असलेले शेकडो ट्रक देशभरातून कच्चा व तयार मालाच्या वाहतुकीसाठी फोंडय़ात दाखल होतात. बऱयाच ट्रकचालक व क्लिनरना त्यासाठी आठवडा ते पंधरा दिवस वास्तव्य करावे लागते. या ट्रकांच्या पार्किंगपासून चालकांच्या प्राथमिक सुविधांपर्यंत फोंडा परिसरातील बगलरस्त्यांचा वापर होत आहे. यावर कायमचा उपाय म्हणजे ट्रक टर्मिनल्स.

फेंडा परिसरात कुंडई, मडकई, बेतोडा औद्योगिक वसाहत व उसगाव येथे औद्योगिक केंद्र आहे. याठिकाणी कच्चा व तयार मालाची ने आण करणारे किमान दोनशे ते अडीचशे ट्रक दिवसाकाठी येत असतात. माल उतरवून नवीन मालाचे भाडे मिळेपर्यंत बऱयाच ट्रकचालकांना आठ ते दहा दिवस मुक्काम करावा लागतो. याकाळात हे ट्रक वाहतूक कार्यालयांजवळ किंवा बगलरस्त्यांच्या बाजूला रांगेत उभे करावे लागतात. तिस्क उसगाव येथील एमआरएफ कारखाना, कुर्टी येथील बगलरस्ता, बेतोडा-कंण्णेव्हाळ जंक्शन, फर्मागुडी-ढवळी बगलरस्ता तसेच फर्मागुडी, कुंडई अशा विविध ठिकाणी हे ट्रक पार्क केलेले आढळून येतात. या ट्रक पार्किंगमुळे वाहतुकीच्या समस्येबरोबरच अन्य इतर प्रश्नही निर्माण झाले असून काही ठिकाणी अशा ट्रक पार्किंगला स्वच्छता व आरोग्याच्यादृष्टीने स्थानिकांचा वाढता विरोध आहे. कंण्णेव्हाळ-बेतोडा जंक्शनजवळील ट्रकपार्किंचा मुद्दा बेतोडा ग्रामसभेत वारंवार उपस्थित केला जात आहे.

व्यापार क्षेत्रात देशभरातील दळण वळणाचे महत्त्वाचे साधन असलेले ट्रक व मुक्काम काळात ट्रकचालक व क्लिनरना शौचालय, स्नानगृह व अन्य प्राथमिक सुविधांची उपलब्ध अत्यावश्यक आहे. मात्र फोंडा परिसरात या मुक्कामाच्या काळात स्वयंपाक, आंघोळ व शौचालयासाठी बगलरस्ते व बाजूची मोकळया जागांचा ट्रकचालकांकडून वापर होत असतो. त्यामुळे ट्रकपार्किंगचा परिसरात कायम दुर्गंधी व आरोग्याची समस्यांनी व्यापलेला आहे.