|Thursday, July 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » युवकाच्या धमक्यांना कंटाळून नवविवाहितेची आत्महत्या

युवकाच्या धमक्यांना कंटाळून नवविवाहितेची आत्महत्या 

वार्ताहर / मजगाव

युवकाच्या धमक्यांना कंटाळून नवविवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी 10 च्या सुमारास मजगाव येथे घडली. मृत विवाहितेचे नाव रेखा संतोष सातगौडा (वय 25) रा. गंगाई गल्ली, मजगाव असे आहे.

रेखा हिचा विवाह आठ महिन्यांपूर्वीच झाला होता. चार-पाच महिन्यांपासून तिला मोबाईलवर एक सारखे मॅसेज व धमक्या पाठविण्याचे काम पंकज बुद्दण्णावर (रा. अनगोळ) हा करीत होता. हा त्रास सहन न झाल्याने शेवटच्या मेसेजला उत्तर पाठवून रेखाने खोलीला आतून कडी घालून पंख्याला साडी बांधून गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. पंकजने तिच्याकडे पाच लाखाची मागणीही केली असल्याचे समजते.  काही नागरिकांच्या मदतीने दरवाजा फोडून रेखाला खाली उतरवून प्रथमोपचार करण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण उपयोग झाला नाही.

उद्यमबाग पोलीस स्थानकात याची माहिती देण्यात आली. दरम्यान या घटनेची माहिती गावभर पसरली आणि माहेरच्या मंडळींनी उद्यमबाग पोलीस स्टेशनला धाव घेऊन पंकज बुद्दण्णावर यास अटक करण्याची मागणी केली. पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली आहे.

यानंतर पुन्हा पिरनवाडीच्या काही नागरिकांनी सीमा लाटकर यांना निवेदन सादर केले. उद्यमबाग पोलीस स्टेशनचे पीएसआय पी. एफ. कनकन्नावर, ए. एस. आय. मुल्ला, हवालदार जोतेपगोळ, महिला हवालदार लकन्नावर यांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह जिल्हा रुग्णालयाला पाठविला. सायंकाळी शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. मजगाव स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.