|Monday, September 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » कलायोगी जी.कांबळेंना ‘पद्मश्री’ने सन्मानित करा

कलायोगी जी.कांबळेंना ‘पद्मश्री’ने सन्मानित करा 

प्रतिनिधी/ कोल्हापूर

  कलायोगी जी. कांबळे यांनी व्यवसायिक, आर्थिक दृष्टीकोन न बागळता कलेचा छंद जोपासला. त्यांनी रेखाटलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या तैलचित्राला राज्यमान्यता मिळाली. या चित्रासाठी कांबळे यांनी शासनाकडून एक रुपयाचेही मानधन घेतले नाही. त्यामुळे शासनाने ‘पद्मश्री’ पुरस्कार देवून जी. कांबळे यांचा यथोचित सन्मान करावा, अशी मागणी चेंबर ऑफ कॉमर्सचे संचालक आनंद माने  यांनी केले. तसेच यासाठी अखिल भारतीय मराठा महासंघासह समस्त कोल्हापूरकरांनी पुढाकारा घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

  अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांचा स्मृतिदिन व कलायोगी जी. कांबळे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्यसाधून महाराजांच्या तैलचित्राचे प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक, अर्थमुव्हर्स असोसिएशनचे चेअरमन रवींद्र पाटील, इतिहास संशोधन इंद्रजित सावंत, बबनराव कांबळे, अशोकराव कांबळे, जेष्ठ दिग्दर्शक यशवंत भालकर प्रमुख  उपस्थित होते.

  याप्रसंगी बोलताना मुळीक म्हणाले, कलायोगी पदवी मिळालेले जी. कांबळे हे एकमेव चित्रकार आहेत. त्यांनी अनेक चित्रपटांसाठी मोठमोठी चित्रे रेखाटली. त्यांची हि चित्रे पाहण्यासाठी कलाप्रेंमींची गर्दी होत असे. त्यांनी रेखाटलेले छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळयाचे चित्र घरोघरी पोहचविण्यासाठी मराठा महासंघ प्रयत्नशिल आहे. आत्तापर्यंत राज्याभिषेक सोहळय़ाची 25 हजार चित्रांचे वितरण करण्यात आले असल्याचे मुळीक यांनी सांगितले.

  जी. कांबळे आर्ट गॅलरी  मोठय़ाकष्टातून उभारली आहे. गॅलरीमधील चित्रांचे जतन करण्यासाठी अनेक सुविधा उपलब्ध करण्याची गरज आहे. त्यामुळे शासनाने जी. कांबळे गॅलरीसाठी निधीची उपलब्धता करुन द्यावी. तसेच जी. कांबळे यांच्या जीवनावर अनेक लेख प्रसिद्ध झाले आहेत. ते एकत्रित करुन त्याची स्मरणिका तयार करण्यात यावी. स्मरणिकेच्या माध्यमातून जी. कांबळे यांचे कलाक्षेत्रातील योगदान जनतेसमारे मांडता येईल. त्यामुळे जी. कांबळे यांच्या जीवनावर अधारित स्मरणिकेसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी दिले. प्रास्ताविक इंद्रजित माने यांनी केले. प्रकाशन सोहळय़ास प्रकाश पाटील, महादेव पाटील, संभाजीराव जगदाळे, शंकरराव शेळके, किशोर घाटगे, गौरव पाटील, बाबासो लवेकर, महेश जाधव, महादेव जाधव, शरद साळुंखे, नेहा मुळीक, अवधुत पाटील आदींसह मराठा महासंघाचे कार्यकर्ते उपस्थित होते. रियाज खान यांनी आभार मानले.