|Saturday, July 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » रिफायनरीच्या चाव्या सौदीकडे?

रिफायनरीच्या चाव्या सौदीकडे? 

मालकीहक्कांबाबत केंद्राचा सकारात्मक पवित्रा – ‘आर्मको’शी वाटाघाटी सुरू – पेट्रोलियमंत्री प्रधान

भारतातील स्थान टिकवण्यासाठी सौदीची खटपट

सरकारी कंपन्यांची मालकी कमी होणार

विशेष प्रतिनिधी /रत्नागिरी

राजापूर तालुक्यातील नाणार येथील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पामधील मालकीतील हिस्सा मिळविण्यासाठी सौदी अरेबीयातील अग्रगण्य पेट्रोलियम कंपनी ‘आर्मके’ ने स्वारस्य दाखवले आहे. या कंपनीच्या अधिकाऱयांची केंद्र सरकारसोबत वाटाघाटी सुरू असून त्याबाबत सरकार सकारात्मक असल्याचे पेट्रोलियम मंत्री धर्मेद्र प्रधान यांनी स्पष्ट केले. एका बाजूने प्रकल्पाला स्थानिकांचा असलेला तीव्र विरोध, दुसरीकडे नव्या कंपनीकडून सुरू असलेले जनप्रबोधन या पार्श्वभुमीवर भारतीय तेल कंपन्यांचा वाटा कमी करून आर्मकोकडे सर्वाधिक हिस्सा देऊन रिफायनरीच्या चाव्या सौदीकडे सोपवण्याच्या हालचाली सुरू असल्याची चर्चा उद्योग वर्तुळात सुरू आहे.

पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान गेल्याच आठवडय़ात गुहागर दौऱयावर आले होते. या दौऱयावेळी इंग्रजी वर्तमानपत्रांच्या काही पत्रकारांशी बोलताना त्यांनी या वाटाघाटींबाबत माहिती दिली. यावेळी बोलताना प्रधान यांनी रत्नागिरी रिफायनरी हा महाकाय व महत्वाकांक्षी प्रकल्प असल्याचे सागतानाच त्याच्या मालकीबाबतचे पर्याय सरकारसमोर खुले असल्याचे स्पष्ट केले. रिफायनरी प्रकल्पासाठी नव्याने स्थापन झालेल्या रत्नागिरी रिफायनरी ऍन्ड पेट्रोकेमिकल कंपनी या कंपनीमध्ये इंडियन ऑईलची 50 टक्के तर भारत पेट्रोलियम व हिंदुस्थान पेट्रोलियमची प्रत्येकी 25 टक्के भागीदारी आहे.

रत्नागिरी रिफायनरी प्रकल्पातील भागिदारीसाठी सौदीमधील आर्मको कंपनी इच्छुक आहे. या कंपनीच्या अधिकाऱयांसोबत याबाबत चर्चेच्या अनेक फेऱया पार पडल्या आहेत. हा मोठा प्रकल्प असून त्यातील मालकी हक्क मिळविण्याबाबत आर्मकोने दिलेल्या प्रस्तावावर आम्ही खुलेपणाने विचार करत असल्याचे प्रधान यांनी सांगितल्याचे वृत्त इंग्रजी वृत्तसंस्थांनी दिले आहे.

5 वर्षांनी प्रारंभ

सर्व कायदेशीर प्रक्रिया व परवानग्या पूर्ण झाल्यानंतर 5 ते 6 वर्षांनी प्रकल्प सुरु होईल. रिफायनरीमध्ये 20 दशलक्ष टन क्षमतेची तीन युनिट उभारण्यात येणार आहेत. त्यातून पेट्रोल, डिझेल, विमान इंधन, पेट्रोकेमिकल्स, प्लास्टिक, टेक्सटाईलसाठी आवश्यक ती रसायने बनवण्यात येणार आहेत. पश्चिम आणि दक्षिण क्षेत्रातील ग्राहकांसाठी रत्नागिरी रिफायनरी उपयुक्त ठरेल, असा दावा प्रधान यांनी केला आहे.

भारतातील स्थान टिकवण्यासाठीच…

भारत हा जगातील तृतीय क्रमांकाचा कच्चे तेल आयात करणारा देश आहे. यापुर्वी सौदी अरेबियाकडून भारताला सर्वाधिक कच्चा तेलाचा पुरवठा होत होता. मात्र मार्च महिन्यात ही जागा इराकने घेतली. त्यामुळे भारतातील स्थान पुन्हा मिळवण्यासाठी सौदीचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून जगातील सर्वात मोठी रिफायनरी म्हणून प्रस्तावित असलेल्या या प्रकल्पात भागीदारीचे प्रयत्न ‘आर्मको’ने चालवले आहेत.

प्रधानांचा दुटप्पीपणा

गुहागर दौऱयावर आलेल्या धर्मेद्र प्रधान यांनी रिफायनरी प्रकल्पाबाबत आपल्याला काहीच माहिती नसल्याचे स्थानिक पत्रकारांशी बोलताना सांगितले होते. त्यांच्या या विधानाबाबत तेव्हा आश्चर्यही व्यक्त झाले. मात्र याच प्रधानांनी इंग्रजी वर्तमान पत्राच्या पत्रकारांशी बोलताना मात्र रिफायनरीच्या चाव्याच परदेशी कंपनीकडे देण्याची तयारी दर्शवली आहे. प्रधान यांच्या दुटप्पी भुमिकेबाबत नाराजी व्यक्त होत आहे.