|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » ‘सुवर्णदुर्ग’ला मिळतोय नवा साज

‘सुवर्णदुर्ग’ला मिळतोय नवा साज 

संरक्षण व संवर्धनसाठी पुरातत्वचा पुढाकार

समुद्रापासून किल्ल्यापर्यत पायऱयांचे काम पूर्णत्वाकडे

पायऱयांसाठी भोर मधून मागवले 1300 काळे दगड

मनोज पवार /दापोली

शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या हर्णै येथील सुवर्णदुर्ग किल्ल्याला नवा साज देण्याचे काम सुरू असून पुरातत्व विभागाने त्यासाठी पुण्यातील भोर येथून खास काळय़ा दगडाच्या मोठय़ा शिळा मागवल्या आहेत. यामुळे लवकरच या किल्ल्याचे रूपडे पालटणार असून त्याला इतिहासाची साक्ष नव्याने देण्यासाठी देण्यासाठी ‘सुवर्णदुर्ग’ सज्ज होत आहे.

शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी ताब्यात घेतलेल्या जलदुर्गांपैकी सुवर्णदुर्ग हा एक महत्वाचा जलदुर्ग. हा किल्ला चारही बाजूंनी पाण्याने वेढलेला आहे. यामुळे किल्ल्यात जाण्यासाठी बोटीशिवाय पर्याय नाही. त्यामुळे किल्ल्यात पर्यटकांचा वावर कमी असल्याने किल्ला अजून सुस्थितीत आहे. मात्र खारी हवा, बुरूजांवर वाढलेली झाडी आणि समुद्राच्या लाटंच्या माऱयाने किल्ल्याच्या भिंती व तटबंदीचे नुकसान होत आहे. गेल्या वर्षी पुरातत्व विभागाने स्थानिक मजुरांच्या सहाय्याने किल्ल्याभोवतीची झाडी तोडून सुशोभिकरणचा प्रयत्न केला होता.

किल्ल्याचे प्रवेशद्वारच वाळूच्यासमोर असून किल्ल्यात जाण्यासाठी पायऱया सुस्थितीत नसल्याने पर्यटक व वृध्द नागरिकांची मोठी गैरसोय होत होती. ही गैरसोय ओळखून पुरातत्व विभागाने समुद्राच्या पाण्याने वाहून गेलेल्या पायऱया पुन्हा बांधण्याचा निर्णय घेतला. मात्र यासाठी कोकणात मिळणारा जांभा दगड उपयुक्त नसल्याने तटबंदीला साजेशा व गतस्मृतींची आठवणी जाग्या करणाऱया दगडांचा शोध सुरू झाला. अशा प्रकारचा दगड पुणे जिल्हय़ातील भोर तालुक्यात आढळत असल्याचे कळल्याने पुरात्व अधिकाऱयांनी तेथून दगड आणण्याचा निर्णय घेतला.

तब्बल 1300 दगड दाखल

भोर येथून तब्बल 1300 मोठे दगड हर्णै येथे आणण्यात आले आहे. हे दगड वजनाने जास्त असल्याने हर्णै येथून ते बोटीने किल्ल्यात घेऊन जाणे आव्हानात्मक होते. एकावेळी बोटीतून केवळ 20 दगडच नेणे शक्य होते. त्यामुळे हे दगड किल्ल्यात नेण्यगासाठी पुरातत्व विभागाच्या बोटीला तब्बल 65 फेऱया माराव्या लागल्या. हे सर्व दगड किल्ल्यात नेल्यावर त्यांना योग्य आकार देऊन पायऱयांचे काम हाती घेण्यात आले. हे काम आता पुर्णत्वाकडे गेले आहे.

समुद्राच्या पाण्यापासून ते थेट किल्ल्यात जाण्यासाठी काळय़ा दगडय़ांच्या किल्ल्याच्या सौंदर्याला साजेशा पायऱया तयार करण्यात आल्या आहेत. या पायऱया काळय़ा दगडांच्या असल्याने त्या कित्येक दशके टिकतील असा दावा पुरातत्व विभागाचे विजयदुर्ग उपविभागाचे अधिकारी राजेश दिवेकर यांनी केला आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे सहाय्यक हिम्मत जाधव यांच्या निरिक्षणाखाली सदर काम सुरू आहे.

कामगार 24 तास किल्ल्यातच

डागडुजीच्या या कामासाठी पुरातत्व विभागाने रायगड जिल्हय़ातील कर्जत येथून कारागीर मागवले आहेत. कर्जत येथील 12 कामगार सुवर्णदुर्ग किल्ल्यात 24 तास तळ ठोकून आहेत. मोठे दगड वाहून नेणे, त्यांना छिन्नीच्या सहाय्याने योग्य आकार देणे, योग्य चढाच्या पायऱया तयार झाल्यावर त्यांना तीन वेळा क्युरिंग करणे आदी कामे या कामगारांकडून करण्यात आली. या कारागिरांच्या राहण्याची व भोजनाची सर्व व्यवस्था किल्ल्यातच करण्यात आली आहे.