|Thursday, April 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » ऍट्रॉसिटी कायदा अधिक कठोर करावा!

ऍट्रॉसिटी कायदा अधिक कठोर करावा! 

तालुका बौद्ध सेवा संघाची मागणी भिडेंना अटक कराः खेडा घटनेचा निषेध

प्रतिनिधी / वैभववाडी:

ऍट्रॉसिटी कायद्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाची सरकारने अंमलबजावणी न करता कायदा अधिक कठोर करावा, अशी मागणी वैभववाडी तालुका बौद्ध सेवा संघाने मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. याबाबतचे निवेदन तहसीलदार संतोष जाधव यांच्याकडे देण्यात आले.

ऍट्रॉसिटी कायदा दलित अत्याचार निवारण्याच्यादृष्टीने फायदेशीर आहे. याबाबत सर्वोच्च न्यायालयात सरकारने वस्तुस्थिती दर्शक दलितांच्या बाजूने आपले म्हणणे म्हणणे मांडले नसल्यामुळे न्यायालयाने हा दलितांच्याबाबतीत दुर्दैवी निकाल दिला आहे. त्यामुळे यामागे सरकारचे षड्यंत्र आहे. तरी सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी न करता ऍट्रॉसिटी कायदा कठोर करावा. अन्यथा, दलित समाज याविरोधात बंड उभे करेल, असा इशारा दिला आहे.

संभाजी भिडेंना अटक करा!

भिमा कोरेगांव हल्ल्यातील मुख्य सूत्रधार संभाजी भिडे यांना त्वरित अटक करून कायदेशीर कारवाई करावी. भिमा कोरेगांव येथे भिमसैनिकांवर हल्ला करण्यात आला. हा हल्ला नियोजित असून मुख्य सूत्रधार संभाजी भिडे चौकशीत दोषी आढळले आहेत. त्यांना तत्काळ अटक करून कायदेशीर कारवाई करावी. अन्यथा, तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.

पुतळय़ाची विटंबना लज्जास्पद

खेडा तालुक्यातील तीनबत्ती नाक्याजवळील जिजामाता उद्यानातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळय़ाची विटंबना ही शासनाला लज्जास्पद बाब आहे. या घटनेमुळे समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. या घटनेचा निषेध नोंदविताना पुतळा विटंबना करणाऱया समाजकंटकांना अटक करावी. अन्यथा, आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही या निवेदनातून देण्यात आला आहे.

Related posts: