|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » तब्बल 12 वर्षांनतर मिळाला ‘सिव्हील’ला सोनोग्राफी तज्ञ!

तब्बल 12 वर्षांनतर मिळाला ‘सिव्हील’ला सोनोग्राफी तज्ञ! 

नांदेडचे डॉ. प्रतिक जोशी झाले स्वेच्छेने रूजू

लठ्ठ पगाराची नोकरी सोडून शासकीय सेवेत दाखल

आता सोनाग्राफी सेंटर राहणार दररोज सुरू

प्रतिनिधी /रत्नागिरी

जिल्हा शासकीय रूग्णालयात गेल्या 12 वर्षांपासून रिक्त असलेल्या सोनोग्राफी तज्ञ या पदासाठीचा शोध अखेर संपला आहे. खासगी सेंटरमधील लाखो रूपये पगाराची मोठी नोकरी सोडून नांदेडचे डॉ. प्रतिक जोशी तज्ञ म्हणून रूजू झाले आहेत. गरीब रूग्णांना सेवा देण्याच्या हेतूनेच आपण हा निर्णय घेतला असून सर्वाचे सहकार्य मिळाल्या कायमस्वरूपी सेवा देण्याचा मनोदय डॉ. जोशी यांनी व्यक्त केला आहे.

तब्बल 12 वर्षांपासून सिव्हीलमध्ये सोनोग्राफी तज्ञाचे पद रिक्त आहे. हे पद भरण्यासाठी अनेकदा जाहीराती, थेट मुलाखती झाल्या. या पदासाठीच्या ऑर्डरही निघाल्या. मात्र तज्ञ अधिकारी हजरच झाले नाहीत. सोनोग्राफी तज्ञांअभावी रूग्णांचे प्रचंड हाल होत असल्याने खासगी सोनाग्राफी तज्ञांच्या मदतीने आठवडय़ातून दोनदा ही सेवा सिव्हीलमध्ये पुरवली जात होती. मात्र आता डॉ. जोशी यांच्या नियुक्तीमुळे ही सेवा दररोज उपलब्ध होणार आहे.

डॉ. प्रतिक अरूणराव जोशी हे नांदेड जिल्हय़ातील असून सोनोग्राफी व क्षकिरण तज्ञ म्हणून त्यांनी कोल्हापूर वैद्यकीय महाविद्यालय व खासगी सेंटरमध्ये काम केले आहे. अलिकडे ते दापोलीत एका खासगी सेंटरमध्ये तज्ञ म्हणून काम करत होते. जिल्हा शासकीय रूग्णालयात सोनोग्राफी तज्ञ नसल्याने रूग्णांना होत असलेल्या त्रासाबाबतची माहिती डॉ. जोशी यांच्यापर्यंत पोहोचली होती. याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रल्हाद देवकर यांच्याशी चर्चा केल्यानंतर डॉ. जोशी यांनी या गरीब रूग्णांसाठी काम करण्याची इच्छा व्यक्त करत गुरूवारी सिव्हीलमध्ये येऊन कार्यभार स्वीकारला.

डॉ. प्रतिक जोशी यांना एका खासगी सेंटरमध्ये लाखो रूपयांच्या नोकरीची ऑफर होती, मात्र ती धुडकावत त्यांनी शासकीय सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे. आपण कायमस्वरूपी या ठिकाणी सेवा देवू मात्र सर्वाचे सहकार्य हवे अशी भावना त्यांनी व्यक्त केली. डॉ. देवकर यांनी त्यांना नियुक्तीपत्र दिले आहे. त्यामुळे शासकीय सुट्टी वगळून नियमित सोनोग्राफी सेंटर सुरू राहणार असल्याचे डॉ. देवकर यांनी सांगितले.

डॉ. जोशींचा आदर्श

सध्या रत्नागिरीतच नव्हे तर संपूर्ण कोकणात वैद्यकीय अधिकाऱयांची मोठी कमतरता आहे. कोकणचे सुपुत्र डॉ. दिपक सावंत यांच्याकडेच आरोग्यमंत्रीपद असूनही हा प्रश्न सोडवण्यात ते अपयशी ठरले आहेत. अनेक डॉक्टर शासकीय सेवेकडे पाठ फिरवत असताना डॉ. प्रतिक जोशी यांच्यासारखे नवीन डॉक्टर स्वतःहून सेवा देण्यासाठी रूजू झाले हे अतिशय उल्लेखनीय व कौतुकास्पद आहे.