|Saturday, November 17, 2018
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » रत्नागिरीची एलईडी मच्छीमारी नौका दाभोळनजिक पकडली!

रत्नागिरीची एलईडी मच्छीमारी नौका दाभोळनजिक पकडली! 

शहर वार्ताहर /दापोली :

दापोली तालुक्यातील हर्णे बंदरातील मच्छिमारांच्या सतर्कतेने बुधवारी रात्री दाभोळ किनाऱयानजिक एलईडी मासेमारी करणारी एक नौका पकडण्यात मत्स्य व्यवसाय विभागाला यश आले. ही मच्छिमारी नौका रत्नागिरीची असून नौका मालक अजित शिंदे यांच्याविरोधात तहसीलदार अर्थात न्यायदंडाधिकाऱयांकडे तक्रार करण्यात आली आहे.

  जिह्यात गेल्या काही महिन्यांपासून एलईडीविरोधात आंदोलन तीव्र करण्यात आले आहे, पण जिह्यातील नौकामालकच मासेमारी व्यवसायाला घातक ठरणारी एलईडी मासेमारी करत असल्याचे सिद्ध झाल्याने आता खळबळ उडाली आहे.

  पोमेंडी येथील अजित शिंदे यांच्या मालकीची कृष्णा नावाची नौका रत्नागिरी बंदराजवळ मासेमारी करते. या नौकेवर एलईडी लाईट आणि तिला लागणारा जनरेटर असून ती मासेमारीसाठी दाभोळजवळ उभी असल्याचे स्थानिक मच्छिमारांना कळले. त्यांनी याबाबत तात्काळ मत्स्य व्यवसाय विभागाच्या अधिकाऱयांना माहिती दिली. परवाना अधिकारी राजकुमार महाडीक हे पोलीस व होमगार्डसह हर्णे बंदरात आले. त्यांनी तेथील स्थानिक मच्छिमारांच्या नौका घेऊन दाभोळच्या दिशेने कूच केली. दाभोळ किनाऱयाजवळ कारूळनजिक एक नौका थांबल्याचे या पथकाला दिसले. या पथकाने नौकेवरील खलाशाला बोटीत काय आहे, असे विचारले असता त्यानेही एलईडी व जनरेटर असल्याचे कबूल केले. तेव्हा या खलाशाला बोट हर्णै बंदरात घेऊन येण्यास सांगण्यात आले. त्यानंतर नौकेवरील खलाशी आणि रत्नागिरी मिरकरवाडय़ाचे रहिवाशी नसीम मिरकर यांच्याकडून कबुली जबाब लिहून घेण्यात आला. मत्स्य परवाना अधिकाऱयाची तक्रार आणि नियमभंग करणाऱयाचा कबुलीजबाब ग्राह्य धरून तहसीलदारांनी हे नियमबाह्य एलईडी मासेमारीचे प्रकरण स्वतःच्या दालनात दाखल करून घेतले. त्यांच्या दालनात याप्रकरणी लवकरच सुनावणी घेण्यात येईल.

Related posts: