|Monday, April 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » सावरकर नाटय़गृह असुविधांच्या गर्तेत

सावरकर नाटय़गृह असुविधांच्या गर्तेत 

प्रतिनिधी /रत्नागिरी :

रत्नागिरीतील भव्य स्वातंत्र्यवीर सावरकर नाटय़गृह असुविधांच्या गर्तेत अधिकाधिक रूतले जात असल्याचे दिसून येत आहे. नगराध्यक्ष राहुल पंडित यांनी दोन महिन्यांपूर्वी नाटय़गृहाच्या सुधारणेसाठी सुमारे 80 लाखांचा निधी आल्याचे व त्यानुसार कामही सुरू झाल्याचे जाहीर केले होते. प्रत्यक्षात मात्र नाटय़गृहातील कुठल्याही कामाची सुरूवात अद्याप झालेली नाही. पावसाळ्यात तर नाटय़गृहाच्या छताची अवस्था आणखीनच गंभीर बनणार असल्याचे सद्य स्थितीवरून प्रकर्षाने जाणवत आहे. नाटय़गृहाच्या या समस्यांच्या सुधारणेबाबत रंगकर्मींनीही वारंवार प्रशासनाला जागे केले आहे. मात्र तात्पुरती डागडुजीही नाटय़गृहात होत नसल्याचे दिसून येत असल्याने नाटय़क्षेत्र व सांस्कृतिक क्षेत्रातून तीव्र नाराजी व्यक्त होऊ लागली आहे.

आता सुट्टीच्या हंगामात नाटकांची मालिकाच नाटय़गृहात आयोजकांनी आयोजित केली आहे. मात्र वाढत्या उष्यात नाटय़गृहाची वातानुकूलीत यंत्रणा बंद असल्याने रसिक प्रेक्षकांना उकाडय़ाने असह्य होत नाटक बघावे लागत आहे. तर गेल्या आठवडय़ात प्रेक्षकांनी वातानुकूलीत यंत्रणा कार्यान्वित नसल्याबद्दल तीव्र नाराजी प्रदर्शित करत मध्यंतरात नाटक थांबविण्याचाही प्रकार घडला. वातानुकूलीत यंत्रणाच नव्हे, तर रत्नागिरी नगर परिषद प्रशासनाकडून वेळीच करण्यात न येणाऱया डागडुजीमुळे नाटय़गृह असुविधांच्या गर्तेत लोटले जात आहे.

नाटय़प्रयोगाच्या निमित्ताने येणारे प्रसिद्ध कलावंतही उत्तम नाटय़गृह असतानाही या असुविधांचा पाढा वाचतात. नाटक करताना अक्षरशः उष्याने पुरते हैराण होतात. वातानुकूलीत यंत्रणेसह नाटय़गृहामागे थाटण्यात आलेल्या खाऊगल्लीने अस्वच्छतेचा कळस गाठला आहे. उंदीर, घुशींचे साम्राज्य तर याठिकाणी वाढीस लागले आहे. स्वच्छतागृहातील बंद पडलेल्या एक्झॉस पॅनमुळे नाटय़गृहात येणारी तीव्र दुर्गंधी, नाटय़गृहाच्या खोल्यांमधील दुर्दशा, छताची बिकट अवस्था, खालील मॅट, तांत्रिक बाबींतील बिघाड आदी एकना अनेक समस्या दुरूस्त होण्याची वाट पहात आहेत.

मात्र प्रशासन डोळेझाक करताना दिसत आहे. नाटय़गृहाबाबत कोणतेही सोयरसुतक नसल्यासारखी अवस्था आहे. न.प. ला प्रतिवर्षी काही लाखांचे उत्त्पन्न मिळवून देणाऱया नाटय़गृहाची दुरावस्था आता टोकाला पोहोचली आहे. नाटय़गृहाच्या स्वच्छतागृहांच्या येथील स्लॅब व भिंतीवरील पाण्याचे ओहोळ हे स्पष्ट करत आहेत की, याची त्वरीत डागडुजी न झाल्यास यंदाच्या पावसाळ्यात नाटय़गृहातील अंतर्गत भागापर्यंत पाणी मुरून नाटय़गृहाची पुरती वाट लागू शकते. स्वच्छतागृहा बाजूच्या दरवाजाचीही दुरवस्था झाली आहे.

Related posts: