|Thursday, July 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » खेडमधील 4 गावात सुरू झालीय पाणी टंचाईची होरपळ

खेडमधील 4 गावात सुरू झालीय पाणी टंचाईची होरपळ 

प्रतिनिधी /रत्नागिरी :

वातावरणातील बदलाचे परिणाम सर्वानाच सहन करावे लागत असून कडक उन्हाळय़ाला प्रारंभ झाला आहे. त्यामुळे तापमानाची सरासरी ओलांडताना दिसत आहे. 37 डिग्रीहून अधिक तापमानाची नोंद जिल्हय़ात होऊ लागल्याने यावर्षीचा उन्हाळा सर्वाधिक कडक असल्याचे मानले जात आहे. त्याचा परिणाम ग्रामीण भागात पाणी टंचाईचे संकट उभे राहू लागले असून जिल्हा प्रशासनामार्फत मागणी झालेल्या खेड तालुक्यातील 4 गावातील 8 वाडय़ांना खासगी टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू करण्यात आल्याचे प्रशासनाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.

  दिवसेंदिवस तीव्र होत चाललेल्या उन्हाळय़ामुळे भर दुपारी नागरिकांना घराबाहेर फिरणेही जिकरीचे बनले आहे. अशा या वाढलेल्या प्रचंड तापमानामुळे जिल्हय़ातील पाणीसाठय़ांवरही विपरित परिणाम होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. आगामी काळात अशा प्रकारे तापमान वाढत राहिल्यास पाणीसाठय़ांवर मर्यादा येण्याचे संकट उभे राहण्याचा धोका वाढला आहे. त्यामुळे पाणी टंचाईग्रस्त गावांच्या संख्येत वाढ होण्याची दाट शक्यता प्रशासन स्तरावरून व्यक्त करण्यात आली आहे. पाण्याचे स्त्रोतांची पातळी घटू लागल्याने पाण्यासाठी नागरिकांची होरपळ होणार आहे. ही बाब लक्षात घेऊन मागणी होणाऱया गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठय़ाचे नियोजन प्रशासन स्तरावरून करण्यात आले आहे.

खेड तालुक्यातील खोपी गावातील रामजीवाडी, जांभळेवाडी येथील नागरिकांना टँकरद्वारे पाण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच चिंचवलीतील ढेबेवाडी, आंबवली गावातील भिंगारा, देवसडे गावातील सावंतवाडी, कदमवाडी, जाधववाडी, मधलेवाडी या गावांना प्रशासन स्तरावरून एक दिवसाआड पाणी पुरवठा टँकरद्वारे सुरू करण्यात आला असल्याचे प्रशासनाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.