|Thursday, July 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » लाखो रूपयांची नोकरी सोडून डॉ.प्रतिक जोशी सिव्हीलमध्ये रूजू

लाखो रूपयांची नोकरी सोडून डॉ.प्रतिक जोशी सिव्हीलमध्ये रूजू 

प्रतिनिधी /रत्नागिरी :

गेली 12 वर्षे जिल्हा शासकीय रूग्णालयातील सोनोग्राफी तज्ञ हे पद रिक्तच होते. त्यामुळे सोनोग्राफी सेंटर खासगी तज्ञांच्या मदतीने आठवडय़ातून दोनदा सुरू केली जात होती. सोनोग्राफी तज्ञांच्या यापूर्वी ऑर्डर झाल्या, मात्र कोणी हजर झाले नाहीत. मात्र लाखो रूपयांची खासगी सेंटरमधील नोकरी सोडून नांदेडचे डॉ.प्रतिक जोशी रत्नागिरी सिव्हीलमध्ये सोनोग्राफी तज्ञ म्हणून हजर झाले आहेत. आपल्याला स्वत:ला येथील गरीब रूग्णांना सेवा द्यायची आहे, आपण कायमस्वरूपी या ठिकाणी सेवा देवू. केवळ सर्वांचे सहकार्य हवे, अशी भावना नव्याने हजर झालेले सोनोग्राफी, क्षयकिरण तज्ञ डॉ.प्रतिक जोशी यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.

डॉ.प्रतिक अरूणराव जोशी मूळ नांदेड जिल्हय़ातील असून सोनोग्राफी व क्षयकिरण तज्ञ म्हणून त्यांनी कोल्हापूर वैद्यकीय महाविद्यालय व खासगी सेंटरमध्ये काम केले आहे. अलिकडे दापोलीत एका खासगी सेंटरमध्ये तज्ञ म्हणून काम करत होते. जिल्हा शासकीय रूग्णालयात गेली 12 वर्षे सोनोग्राफी तज्ञच नाही. कॉन्ट्रक्ट बेसवर वैद्यकीय अधिकारी मदत करतात, अशी माहिती डॉ.जोशी यांच्यापर्यंत यापूर्वी पोहोचली होती. तज्ञ नसल्याने विशेषत: गरोदर मातांचे हाल होत होते. याविषयी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.प्रल्हाद देवकर यांनी डॉ.जोशी यांना सविस्तर माहितीही दिली होती. यानंतर डॉ.जोशी यांनी आपल्याला या गरीब रूग्णांसाठी काम करायचे म्हणून स्वत:हून गुरूवारी येवून या पदाचा कार्यभार स्वीकारला.