|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » leadingnews » आरक्षण बंद होऊ देणार नाही : अमित शहा

आरक्षण बंद होऊ देणार नाही : अमित शहा 

ऑनलाईन टीम / मुंबई :

राहुल गांधी मोदींना साडेचार वर्षाचा लेखाजोखा मागतात. मात्र, जनता तुम्हाला चार पिढय़ांचा हिशोब मागत आहे. शरद पवारांनी इंजेक्शन टोचल्यावरच राहुल गांधी बोलत असतात, असा टोला भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांनी आज लगावला. भाजपा आरक्षण कधीच बंद करणार नाही, कुणी तसा प्रयत्न केला, तरीही तो यशस्वी होऊ देणार नाही, अशी ग्वाहीदेखील त्यांनी केली.

भाजपाच्या 38 व्या स्थापनादिनानिमित्त वांदे-कुर्ला संकुलातल्या महामेळाव्यात पक्षाने शहा यांच्या उपस्थितीत जोरदार शक्तिप्रदर्शन केले. या महामेळाव्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, विनोद तावडे, प्रकाश मेहतांसह दिग्गज नेत्यांनी उपस्थिती लावली आहे. शहा यांनी आरक्षणाच्या मुद्दय़ावर आपले मत मांडले. दलित जनतेतील सरकारच्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर आरक्षण कधीही बंद होऊ देणार नाही, असे त्यांनी सांगितले.

या मेळाव्यात अमित शहा म्हणाले, देशात मोदींची लाट आल्यामुळे सर्व विरोधक एकत्र आले आहेत. केंदात नरेंद्र, राज्यात देवेंद्र ही लोकप्रिय घोषणा असून, या दोन्ही सरकारवर भ्रष्टाचाराचा एकही आरोप नाही. भाजपा 2019 ची निवडणूक नक्कीच जिंकेल. पण आश्वासनांवर नाही, तर आम्ही केलेल्या कामावर निवडणूक जिंकून दाखवू. मोदी सरकार सब का साथ सब का विकास या सूत्रानुसार काम करत आले आहे आणि येथून पुढेही याच सूत्रावर आम्ही काम करू. 2014 पेक्षा आता आमच्या मित्रपक्षांची संख्या वाढली आहे. मोदींवर जनतेचा विश्वास आहे.

भाजपाची सुरूवात दहा सदस्यांनी झाली. आजच्या स्थितीला भाजपाचे अकरा हजार कोटी सदस्य आहेत. भाजपासाठी अनेक कार्यकर्त्यांनी बलिदान दिले, संघर्ष केला. या संघर्षामुळे भाजपा आज हे शिखर गाठू शकली, अशा शब्दांत शहा यांनी कार्यकर्त्यांचे आभार मानले.

भाजपाने पारदर्शी सरकारचे नवे मॉडेल दिले

भाजपाने पारदर्शी सरकारचे नवे मॉडेल देशाला दिले, असा दावा भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत केला. पक्षाच्या स्थापनादिनाच्या पार्श्वभूमीवर बोलताना ते म्हणाले, भाजपा हा मूल्यांवर चालणार पक्ष आहे. पारदर्शकता, संवेदनशीलता, कार्यक्षमता हे पक्षाचे गमक आहे.