|Sunday, July 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » अजूनी यौवनात मी…!

अजूनी यौवनात मी…! 

शहाण्णव वर्षांचे सायकलवीर

जागतिक आरोग्य दिनी उलगडले आरोग्याचे रहस्य

मनोज पवार /दापोली

दापोली-खेड रस्त्यावरून धावणाऱया वेगवान गाडय़ांमधून हळूच वाट काढत आपली सायकल व सायकलवरचं ओझं सांभाळत शेतात व बाजारहाट करायला जाणारे तब्बल शहाण्णव वर्षांचे ‘तरूण’ आजोबा धोंडू काष्टे यांना पाहून जाणारे-येणारे वाहनचालक थक्क होतात. आपल्या शहाण्णवव्या वर्षीदेखील आपली सायकल सुटली नसल्याचे व आपण शंभरी पार केल्यावरदेखील सायकल चालवणार असल्याची जिद्द ते बोलून दाखवतात तेव्हा धूमस्टाईल तरूणांच्या मानादेखील खाली जातात.

दापोली-खेड रस्त्यावर असणाऱया कुंभवे गावातील धोंडू गणू काष्टे हे एक प्रतिष्ठीत नागरिक आहेत. ते आपल्या शहाण्णवव्या वर्षीदेखील आपल्या आवडत्या सायकलवरून दररोज शेतात जातात. शेतात काम करणं त्यांना लहानपणापासून आवडतं. तरूण मंडळी जी कामं शेतात करतात, ती सर्व कामं अजूनदेखील धोंडू काष्टे करतात. शेतीच्या कामाला लागणाऱया वस्तू शेतात नेणे, शेतातील वस्तू घरी आणणे आदी कामे ते सायकलवरून करतात. तसेच वेळप्रसंगी ते गावातील किराणा दुकानातदेखील जाऊन सायकलवरून किराणा सामान घेऊन येतात, त्यावेळी ग्रामस्थ थक्क होऊन पाहत बसतात.

पूर्वी धोंडू काष्टे हे घराच्या बांधकामाला लागणारे वासे बनवण्याचे काम करत असत. त्यांना पाच अपत्ये. आता त्यांची नातवंडेदेखील मोठी झाली आहेत. ती सर्व मोटरसायकल चालवतात. मात्र धोंडू काष्टे हल्ली हल्लीपर्यंत त्यांचे नातेवाईक असणाऱया दापोली-मंडणगड रोडवरील करंजाणी, खेर्डी येथे सायकलने जात असत. दापोलीतही सायकलवरून येत असत. सध्यातरी ते कुण्या गावात दुःखद प्रसंग घडला तरी सायकलवरून जातात. यामुळे पेट्रोलच्या किंमती कितीही वाढल्या तरी आपल्याला काही फरक पडत नाही, असे ते सांगतात.

धोंडू काष्टे हे उमेदीच्या काळात कुंभवे ते दापोली हा 10 किलोमीटरचा प्रवास दररोज चालत करत असत. ते दापोली शहरातील डॉ. मंडलिक यांच्याकडे 2 रूपये महिना एवढय़ा पगारात दवाखाना झाडायच्या कामाला होते. एकदा डॉ. मंडलिक झोपलेले असताना त्यांची सायकल काष्टे यांनी चालवून पाहिली. मात्र हे डॉ. मंडलिक यांनी पाहिले व त्यांना तीच सायकल भेट दिली. तेव्हापासून काष्टे यांची व सायकलची गट्टी जमली ती आजपर्यंत. यानंतर ते मुंबईतदेखील कामाला होते. तेथेदेखील ते सायकलच चालवत असत. मात्र अजूनही सायकल चालवून त्यांचे सांधे कधी दुखले नाहीत की ते वयोवृध्द झाले म्हणून सायकल चालवताना पडलेले नाहीत. या त्यांच्या अनोख्या छंदामुळे येथील आमदार संजय कदम यांनी त्यांचा दोनवेळा सत्कारदेखील केला आहे. जागतिक आरोग्य दिनानिमित्त त्यांची भेट घेतली असता आपल्या आरोग्याचे रहस्य सांगताना, दररोज हाताला काम, वेळच्यावेळी जेवण, योग्य झोप व व्यसनांपासून जो दूर रहातो तो आरोग्यसंपन्न झाल्यावाचून रहात नाही, असे सांगतात.