|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » उद्योग » बाजारात दिवसअखेरीस खरेदी

बाजारात दिवसअखेरीस खरेदी 

बीएसईचा सेन्सेक्स 30, एनएसईचा निफ्टी 6 अंकाने वधारला

वृत्तसंस्था/ मुंबई

सप्ताहाच्या शेवटच्या सत्रात बाजारात मर्यादित प्रमाणात व्यवहार दिसून आला. मात्र शेवटच्या तासात खरेदी झाल्याने बाजार उंचावत बंद झाला. बाजारात आलेली तेजी कायम राहण्यास अपयश आले आणि सेन्सेक्स, निफ्टी किरकोळ वधारत बंद झाला. सत्रातील तेजीदरम्यान निफ्टी 10,350 आणि सेन्सेक्स 33,700 पर्यंत वधारला होता.

दिग्गज समभागांच्या तुलनेत मिडकॅप आणि स्मॉलकॅप समभागात चांगली खरेदी दिसून आली. बीएसईचा मिडकॅप निर्देशांक 0.7 टक्क्यांनी वधारत बंद झाला, निफ्टीचा मिडकॅप 100 निर्देशांक 0.5 टक्क्यांनी मजबूत झाला. बीएसईचा स्मॉलकॅप निर्देशांक 0.6 टक्क्यांनी वधारला.

बीएसईचा सेन्सेक्स 30 अंकाने वधारत 33,327 वर बंद झाला. एनएसईचा निफ्टी 6.4 अंकाने मजबूत होत 10,331 वर बंद झाला.

बँकिंग, वाहन, एफएमसीजी, औषध, रिअल्टी, भांडवली वस्तू, तेल आणि वायू समभागात खरेदी झाल्याने बाजार वधारला. बँक निफ्टी 0.5 टक्क्यांनी वधारत 24,873 वर बंद झाला. आयटी, भांडवली वस्तू, धातू समभागात दबाव दिसून आला.

दिग्गज समभागांची कामगिरी

ल्यूपिन, बीपीसीएल, टायटन, एचपीसीएल, टाटा स्टील, आयसीआयसीआय बँक, मारुती सुझुकी, अदानी पोर्ट्स, सन फार्मा 2.8-0.8 टक्क्यांनी वधारले. भारती एअरटेल, इन्फोसिस, वेदान्ता, एचसीएल टेक, एल ऍण्ड टी, बजाज ऑटो, टाटा मोटर्स डीव्हीआर 2.3-0.7 टक्क्यांनी घसरले.

जीएमआर इन्फ्रा, पिरामल एन्टरप्रायजेस, रिलायन्स कम्युनिकेशन्स, एम्फेसिस, फेडरल बँक 6.9-3.9 टक्क्यांनी वधारले. वक्रांगी, रिलायन्स पॉवर, नाल्को, मुथ्थूट फायनान्स, जीई टी ऍण्ड डी 5-1.5 टक्क्यांनी घसरले.

स्मॉलकॅप समभागात पायोनियर डिस्टिलिरीज, फिनियोटेक्स केम, एसटीसी, केडीडीएल, ग्लोबल ऑफशोअर 14.7-10 टक्क्यांनी मजबूत झाले. शैली इंजिनियरिंग, तळवलकर्स फिटनेस, व्ही बी इन्डस्ट्रीज, अलंकित 6.5-4.5 टक्क्यांनी घसरले.