|Thursday, July 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » हुश्श…दहावीची परीक्षा संपली!

हुश्श…दहावीची परीक्षा संपली! 

प्रतिनिधी / बेळगाव

समाज विज्ञान विषयाच्या पेपरने यंदाच्या दहावी परीक्षेची शुक्रवारी सांगता झाली. आता विद्यार्थ्यांचे लक्ष निकालाकडे लागून राहिले असून पेपर मूल्यमापनाचे काम दि. 10 एप्रिलपासून सुरू होणार आहे. दरम्यान शुक्रवारी दहावीचा शेवटचा पेपर सुरळीतपणे पार पडला. दुपारी 12.30 नंतर पेपर संपताच परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी एकच नि:श्वास सोडला. 23 मार्चपासून सुरू झालेल्या दहावीच्या परीक्षेचे ‘टेन्शन’ विद्यार्थ्यांबरोबरच पालकांनाही होते. शुक्रवारी हे सर्वजण ‘रिलॅक्स’ झाल्याचे दिसून आले. परीक्षा संपल्याच्या आनंदाच्याभरात बऱयाच विद्यार्थ्यांनी एकमेकांवर रंगांची उधळणही केली.

शुक्रवारी दहावीचा समाज विज्ञान पेपर होता. या पेपरलाही गैरहजर राहणाऱया विद्यार्थ्यांची संख्या जास्त होती. तब्बल 517 विद्यार्थ्यांनी पेपरला दांडी मारली. एकूण 31 हजार विद्यार्थ्यांपैकी 30483 विद्यार्थी हजर राहिले होते. यंदा पहिल्यांदाच सर्व परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेऱयांची नजर होती. बेळगाव शैक्षणिक जिल्हय़ातील एकूण 104 परीक्षा केंद्रांवर दहावीची परीक्षा घेण्यात आली. एकूण 31061 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नावनोंदणी केली होती. यंदाची परीक्षा सुरळीतपणे पार पडली असून परीक्षेत 1 विद्यार्था डिबार झाला आहे.

विज्ञान पेपर सोडविणे गेले अवघड

दहावी परीक्षा तसेच एकंदरीत परीक्षा प्रक्रियेबाबत विद्यार्थ्यांशी संवाद साधला असता विद्यार्थ्यांच्या चेहऱयावर उत्साह दिसून येत होता. विद्यार्थ्यांनी ‘तरुण भारत’ प्रतिनिधीशी बोलताना परीक्षा जरी सुरळीतपणे पार पडली असली तरी विज्ञान विषयाचा पेपर अवघड गेल्याचे सांगितले. या पेपरमध्ये अनेक संदर्भावर कठीण प्रश्न विचारण्यात आले होते. यामुळे हा पेपर सोडविणे अवघड गेला आहे. यामुळे निकालावरही याचा काहीसा परिणाम होण्याची शक्मयता वर्तविली जात आहे.