|Thursday, April 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » विचित्र अपघातात पोलिसाचा मृत्यू

विचित्र अपघातात पोलिसाचा मृत्यू 

पोलीस भरती परिक्षेच्या बंदोबस्ताला जाताना दुर्घटना

पोलीसांच्या दुचाकीचा डमडम व डंपरला धडक

जालगाव येथील घटनेत अन्य पोलीस गंभीर

प्रतिनिधी /दापोली

रत्नागिरी येथे पोलीस भरती परीक्षेच्या बंदोबस्तासाठी निघालेल्या दोन पोलीस कर्मचाऱयांच्या मोटरसायकच्या झालेल्या विचित्र अपघातात पोलीस नाईक कमलाकर शेकरे (29) यांचा मृत्यू झाला. जालगाव ग्रामपंचायतीसमोर त्यांची दुचाकी प्रथम सहाआसनी रिक्षा (डमडम) व नंतर डंपरवर आदळून हा भीषण अपघात झाला. यात उदय मोनये (27) हे दुसरे पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत.

कमलाकर शेकरे व उदय मोनये शुक्रवारी रात्रपाळीची सेवा बजावून शनिवारी सकाळी पोलीस भरतीच्या बंदोबस्ताकरीता रत्नागिरी येथे मोटरसायकलवरून निघाले होते. दाभोळ मार्गे रत्नागिरीत जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. जालगाव ग्रामपंचायतीच्या समोरून दाभोळकडे जात असताना त्यांच्या पुढे असणाऱया डमडम गाडीने अचानक वेग कमी केला. यामुळे त्यांची दुचाकी डमडमवर आदळली याचवेळी समोरून येणाऱया डंपरच्या पुढील बाजूच्या बंपर व पायरीवर आदळली. त्यांच्या मोटारसायकलचे हॅन्डल डंपरला आदळून वाकल्याने गाडीचा तोल जाऊन ते खाली फेकले गेले. यात दोघेही गंभीर जखमी झाले.

अपघातानंतर स्थानिक ग्रामस्थांनी दोन्ही जखमी पोलीस कर्मचाऱयांना खासगी वाहनातुन तातडीने दापोली उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले. मात्र, तपसणी केल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱयांनी कमलाकर शेकरे यांना मृत घोषीत केले. उदय मोनये यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांचे सीटी स्कॅन झाल्यानंतर भागवत हॉस्पिटलमध्ये अधिक उपचार सुरू आहेत. या प्रकरणाची फिर्याद गिम्हवणे येथील डंपर चालक तुषार गुरव यांनी येथील पोलीस स्थानकात दिली आहे.

हेल्मेट असते तर…..

शेकरे हे मुळ नाशिक जिल्हय़ातील, तर मोनये हे सांगली जिल्हय़ातील आहेत. शेकरे यांना सहा महिन्यांच्या जुळय़ा मुली आहेत. मोनये यांच्या लग्नाला केवळ 6 महिने झाले आहेत. या पोलीसांच्या डोक्यावर हेल्मेट नसल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली व त्यातच शेकरे यांचा मृत्यू झाला. त्यामुळे हेल्मेट वापरले असते तर शेकरे यांचे प्राण वाचले असते अशी चर्चा होती.

Related posts: