|Friday, January 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » वडूज कुस्तीत पोकळ घिस्सा डावावर नंदू आबदार विजयी

वडूज कुस्तीत पोकळ घिस्सा डावावर नंदू आबदार विजयी 

प्रतिनिधी/ वडूज

येथील जोतिलिंग यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या कुस्त्यांच्या जंगी मैदानात कोल्हापूर येथील न्यु मोतिबाग तालमीच्या उपमहाराष्ट्र केसरी नंदू आबदारने गोकुळ वस्ताज तालमीच्या भारत मदनेला पोकळ घिस्सा लावत सुमारे दीड लाखाचे इनाम जिंकले. यावेळी कुस्ती शौकीनांनी एकच जल्लोष केला. विविध कुत्यांना प्रक्षेकांनी चांगला प्रतिसाद दिला.  

 द्वितीय क्रमांकाच्या कुस्तीत पारगांवच्या रामा पवारने पुण्याच्या जयदीप गायकवाडला आस्मान दाखविले. जाखणगांव येथील भोसले व्यायामशाळेच्या प्रशांत शिंदेने सह्याद्री संकुलाच्या नागेश शिंदेवर मात करत 1 लाखाचे इनाम जिंकले. शाहूपुरी तालमीच्या गणेश कुंकुलेने शाहू आखाडय़ाच्या राहुल सुळला पराभवाची धूळ चारली. पारगांवच्या शरद पवारने लिंबगांवच्या कैलास मगरवर मात केली. नागाचे कुमठे येथील निखिल मांडवेने पुण्याच्या सुरज राऊतला धुळ चारली. म्हसवड येथील बाळू बहिरवाल या चिवट मल्लाने मुरगुड तालमीच्या पृथ्वीराज पाटील यास चितपट केल्याने मांडवेकरांनी निराशा झाली. मनोज कदम विरुध्द गोपाल तावसी तसेच नढवळ येथील कन्हैय्या माने व पुण्याच्या अनिकेत चव्हाण यांच्यातील कुस्ती बरोबरीत सोडविण्यात आली.

            उपमहाराष्ट्र केसरी विकासतात्या यांच्यासह अर्जुन पाटील, मारुती जाधव, तानाजी मांडवे, उमेश पाटील यांनी पंच म्हणून काम पाहिले. सांगली येथील जोतिराम वाजे, राजेंद्र जगदाळे पिंगळीकर यांनी कुस्त्यांचे धावते समालोचन केले. पंचायत समितीचे सभापती संदीप मांडवे, बाजार समितीचे सभापती सी. एम. पाटील, महाराष्ट्र केसरी धनाजी फडतरे आदींसह मान्यवरांनी भेट देवून संयोजकांचे कौतुक केले. यात्रा कमेटी व ग्रामस्थांच्या वतीने मान्यवर पदाधिकारी तसेच प्रमुख कुस्ती शौकिनांचा सत्कार करण्यात आला. रात्री झालेल्या लावण्यखणी या लावण्यांच्या करमणूक कार्यक्रमास श्रोत्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

 

 

 

Related posts: