|Tuesday, June 25, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » वीज पडून जिल्हय़ात दोघांचा मृत्यू

वीज पडून जिल्हय़ात दोघांचा मृत्यू 

मृत सातारा व सोनगाव येथील, सातारा शहरासह जिल्हय़ाच्या विविध ठिकाणी  पाऊ स

प्रतिनिधी/ सातारा

शनिवारीप्रमाणेच रविवारीसुद्धा दुपारनंतर वाऱयासह वीजेचा कडकडाट जिल्हय़ाच्या अनेक  भागात सुरू झाला. यामुळे शेतकरी व नागरिकांची मोठी त्रेधा उडाली. सातारा शहरासह जावली, खटाव, महाबळेश्वर तालुक्यात पाऊस झाला. दरम्यान, सोनगाव येथे रानात काम करणाऱया शेतकऱयांच्या अंगावर वीज कोसळली. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. तर महाबळेश्वरकडे लग्नासाठी दुचाकीवरून निघालेल्या सातारा येथील एकाचा केळघर येथे वीज पडून मृत्यू झाला. 

सोनगांवमध्ये वीज कोसळल्याने शेतकरी ठार

कुडाळ

जावली तालुक्यात सलग दुसऱया दिवशीही दुपारपासून मेघगर्जनेसह पावसाच्या सरी कोसळल्या. सोनगांव येथे शेतात काम करत असताना अंगावर वीज कोसळल्याने शेतकरी आदिनाथ दिनकर मोरे (वय 32 रा. सोनगांव, ता. जावली) खाली पडून बेशुद्ध झाले. त्यांना कुडाळ येथील सरकारी रुग्णालयात दाखल केले असता  आदिनाथ मोरे यांचा मृत्यू झाला असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. ऋतुल रासकर यांनी सांगितले.

दरम्यान, जावलीत रविवारी पुन्हा सलग दुसऱया दिवशीही कुडाळ परिसरात गारांचा पाऊस पडला. सायंकाळी विजांचा कडकडाटासह कुडाळ, सोनगाव, भिवडी,  बेलावडे, सर्जापुर, सरताळे परिसरात पावसाच्या सरी कोसळल्या. करहर परिसरात व जावळीच्या काही डोंगरी भागातही पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. सुमारे  अर्धा तास पडलेल्या पावसामुळे हवेत काही काळ गारवा पसरला. परंतु, शेतांमध्ये काढून ठेवलेली वैरण भिजल्याने शेतकऱयांचे नुकसान झाले. गारांमुळे अनेक ठिकाणी आंब्याच्या झाडांना आलेला मोहोर, फळे गळून पडली. 

लग्नासाठी निघालेल्या दुचाकीस्वाराचा वीज पडून मृत्यू

केळघर

रविवारी दुपारी झालेल्या अवकाळी पावसाने केळघर (ता. जावली) येथील स्मशानभूमीजवळ गणपत नारकर (वय 38 मंगळवार पेठ, सातारा) यांचा वीज पडून जागीच मृत्यू झाला.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी कि, रविवारी दुपारी चार ते साडेपाचपर्यंत विजेच्या कडकडाटसह परिसरात पाऊस सुरू होता. या दरम्यान सातारहून महाबळेश्वरला लग्नासाठी साताऱयातील मंगळवारपेठेतील काही जण मोटारसायकलवरून निघाले होते. यापैकी गणपत नारकर व त्यांचे मित्र लक्ष्मण अवकीरकर हे मोटारसायकलने चालले होते. लघुशंकेसाठी केळघरच्या स्मशानभूमी जवळ थांबले होते. नारकर हे निलगिरीच्या झाडाजवळ गेले असता त्यांच्यावर वीज पडून त्यांचा जागीच मृत्यु झाला. नारकर हे सातारमध्ये इमारतीच्या सेटंरिगची कामे करत होते. सदर घटनेची नोंद मेढा पोलीस स्टेशनला झाली आहे.

सातारा शहरात मेघगर्जनेसह अर्धा तास पाऊस

रविवारी साताऱयात पावसाने अर्धातास मेघगर्जनेस पडल्यामुळे घामाघूम झालेल्या सातारकरांना दिलासा मिळाला. गेली अनेक दिवसापासून उन्हाचे प्रमाण वाढले आहे. असे असताना दुपारी 12 ते 4 घराबाहेर पडणे लोकांनी टाळले होते. आता दोन दिवसांपासून वळिवाने हजेरी लावण्यात सुरूवात केली आहे. रविवारी सुट्टी असल्यामुळे अनेकजण खरेदीसाठी घराबाहेर पडले होते. यावेळी अचानक पाऊस सुरू झाल्यामुळे अनेकांची तारांबळ झाली. या पावसापासून बचाव करण्यासाठी  अनेकांनी दुकाने, हॉटेल, इमारतीच्या आडोशाला उभे राहणे पसंत केले. तर तरुणाई मात्र भिजण्याचा आनंद लुटत होती.  तर कित्येकजण सुसाट वेगाने  वाहने चालवताना दिसत होती.